कोकणातील पर्यटन, मच्छीमार, कृषिक्षेत्रावर झालेल्या अन्यायासाठी उद्या (ता. १९) आंदोलन होणार आहे. समृद्ध कोकण संघटनेतर्फे स्वराज्यभूमी कोकण आंदोलन आणि स्वायत्त कोकण परिषद होणार आहे. याची सुरुवात हॉटेल अलंकार ते साळवीस्टॉप अशी रॅलीने होणार आहे. त्यानंतर अंबर हॉलमध्ये स्वायत्त कोकण परिषद होईल. मारुती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा काढली जाणार असून, दुपारी ३ वा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले जाईल, अशी माहिती मुख्य संयोजक संजय यादवराव यांनी दिली.
जिल्हा शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ग्रादवराव म्हणाले, ‘या आंदोलनामध्ये आंबा बागायतदारांना कर्जमाफी मिळावी, या मुख्य मागणीसह पर्यटन वाढण्यासाठी पायाभूत सुविधांचे मजबुतीकरण करावे, कृषिक्षेत्रालाही चांगले दिवस यावेत यासाठी आंदोलन होणार आहे. त्यांच्या न्यायहक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. ७५ वर्षे कोकण दुर्लक्षित आहे. ३८ टक्के उद्योग, प्रमुख बंदरे कोकणात आहेत. कोकण आर्थिक विकासाचा कणा आहे तरी पायाभूत सुविधांची वानवा आहे. समृद्ध कोकण संघटना उद्या महत्त्वाची घोषणा करणार आहे ती म्हणजे स्वायत्त कोकण हवे. शासनाकडून येणाऱ्या निधीचा योग्य विनियोग होत नाही म्हणून कॉन्ट्रॅक्टरला बाजूला करून तज्ज्ञांचा यामध्ये समावेश करून निधीचा योग्य वापर करावा, अशी मागणी आहे.