28 C
Ratnagiri
Friday, June 13, 2025

रत्नदुर्गाच्या बुरूज परिसरात अतिक्रमण…

रत्नागिरीतील प्रसिद्ध रत्नदुर्ग किल्ल्याचा टेहळणी बुरूज पेठकिल्ला...

शिक्षकांना प्रशिक्षणात अपमानास्पद वागणूक – संभाजी थोरात

राज्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या प्रशिक्षणामध्ये प्रथमच...

कृषी विद्यापीठाचा ई-मेल हॅक करून फसवणूक

येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या...
HomeRatnagiriक्युआर कोडमुळे हापूसमधील भेसळ थांबणार

क्युआर कोडमुळे हापूसमधील भेसळ थांबणार

परराज्यातील आंबा कोकणचा हापूस म्हणून बाजारात विकला जात होता.

हापूसमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी जीआय मानांकन घेतलेल्या आंबा बागायतदारांसाठी क्युआर कोड देण्यास सुरुवात केली आहे. महिन्याभरात ६५ हजार क्युआर कोडचे वितरण करण्यात आले होते. अस्सल हापूसची ओळख पटवून देणारा हा क्युआर कोड बागायतदारांना उपयुक्त ठरत आहे. मालाच्या दर्जाबरोबरच मार्केटिंगही चांगल्या प्रकारे होत असल्याची माहिती कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे, सचिव मुकुंद जोशी यांनी दिली. गेल्या काही वर्षांत परराज्यातील आंबा कोकणचा हापूस म्हणून बाजारात विकला जात होता. त्याला आळा बसण्यासाठी बागायतदारांकडून वारंवार पाठपुरावा केला जात होता. दोन वर्षापूर्वी हापूस नावाने भौगोलिक निर्देशांक (जीआय टॅग) प्राप्त झाल्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे या पाच जिल्ह्यातील आंबा हा हापूस नावाने विकला जाऊ लागला. तसे जीआय सर्टिफिकेटही शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात झाली.

त्यासाठी कोकण कृषी विद्यापीठासह तीन संस्थांची निवड केली गेली. तरीही परराज्यातून येणारा आंबा हापूस नावाने विकला जात होता. मोठ्या प्रमाणात होणारी भेसळ थांबवण्यासाठी क्युआर कोडचा पर्याय आणला गेला. त्यासाठी शेतकऱ्याला क्युआर कोड स्टीकर दिला जातो. विक्रीसाठी पाठवलेल्या फळावर स्टीकर लावण्यात येतो. तो स्कॅन केल्यावर हापूसची सविस्तर माहिती मिळते. त्यामध्ये बागायतदार कोण, बागेचे फोटो आणि औषधे कोणती फवारली जातात याचीही माहिती मिळते. चांगला आंबा असलेल्या बागायतदाराची बाजारातील पत वाढत आहे. २०२३ मध्ये अडीच लाख, तर २०२४ मध्ये साडेतीन लाख स्टीकर विक्रीला गेले होते. त्याचा फायदाही आंबा बागायतदारांना झाला आहे. आतापर्यंत ६५ हजार स्टीकर बागायतदारांनी घेतल्याचे जोशी यांनी सांगितले.

अस्सल हापूस मिळणार – हापूस नावाने इतर जिल्ह्यातील आंबा विकला जायचा. यातून शेतकरी आणि ग्राहकांचेदेखील मोठे नुकसान होते; परंतु क्युआर कोडमुळे ग्राहक आणि शेतकरी यांचा डायरेक्ट संपर्क येणार आहे त्याशिवाय भेसळ थांबणार आहे आणि ग्राहकांना अस्सल हापसूची चव चाखता येणार आहे. यामुळे हापूसच्या नावावर होणारी भेसळ थांबणार आहे.

स्टीकरचा कालावधी १४ दिवसांचा – फळावर लावलेला स्टीकरचा वापर पुन्हा होऊ नये यासाठी यंदापासून उपाययोजना करण्यात आली आहे. स्टीकर वापराचा कालावधी १४ दिवसांचा ठेवण्यात आला आहे. त्यानंतर तो पुन्हा वापरता येणार नाही. यापूर्वी स्टीकर काढून पुन्हा वापरल्याचे प्रकार पुढे आले होते. त्यामुळे ही कार्यवाही करण्यात आल्याचे जोशी यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular