मिऱ्या-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. मात्र त्यात अचानक पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका बसत असून वाहनचालकांची पंचाईत होत आहे. गेले दोन दिवस सायंकाळच्या सुमारास पावसाची हजेरी ठरलेली आहे. त्यामुळे खोदाई केलेल्या रस्त्यावर परिसरातील चिखल येऊन त्यामधून वाहन चालविण्याची कसरत करावी लागत आहे. दिवसा कडकडीत उन्हामुळे रस्ते पुन्हा सुकल्यामुळे वाहतूक सुरळीत होत आहे. मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे थांबलेल्या कामाला सध्या वेग आला आहे. रत्नागिरी शहराजवळील जे. के. फाईलपासून पुढे कुवारबावपर्यंतची कामे वेगाने सुरू आहेत. त्यासाठी काही ठिकाणी जुना रस्ता खोदून ठेवलेला आहे. तसेच रस्ता सपाटीकरणासाठी लाल माती टाकण्यात आलेली आहे. मागील आठवड्यात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे चौपदरीकरणाच्या कामाला वेग आला होता.
मात्र सलग तीन दिवस जोरदार पाऊस सुरू झालेला आहे. सायंकाळच्या सत्रात पडणाऱ्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी साचून राहते. रस्ता सपाटीकरणासाठी टाकलेली माती पाण्याबरोबर वाहून येत असल्यामुळे चिखल होत आहे. त्याचा सर्वाधिक त्रास सायंकाळी घरी परतणाऱ्या दुचाकी चालकांना बसत आहे. चिखलयुक्त पाण्यातून मार्ग काढत पुढे जावे लागते. सलग दोन दिवस ही परिस्थिती उद्भवत आहे. सुदैवाने दिवसा कडकडीत ऊन पडत असल्यामुळे चिखल सुकतो. त्यामुळे वाहने हाकणे सोपे जाते, अन्यथा परिस्थिती बिकट झाली असती.