प्रतिकूल हवामान आणि अवकाळी पावसामुळे तालुक्यातील भू-खिणगिणी-कोतापूर- पेंडखळे परिसरातील आंबा-काजू बागायदारांचे यंदा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या बागांचा विमा उतरविण्यात आलेला असतानाही लाभांश मिळालेला नाही. या परिसरातील सुमारे तीनशेहून अधिक बागायतारांना फटका बसलेला आहे. याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदविण्यात आली असल्याचे येथील बागायतदारांनी सांगितले. तालुक्यातील भू पसिरामध्ये आंबा-काजूच्या बागायती आहेत. दरवर्षी या बागायतदारांना हंगामातील प्रतिकूल हवामानाचा फटका बसतो. २०२३-२४ या वर्षातही येथील बागायतदारांना अवकाळी पावसासह प्रतिकूलं हवामानाचा चांगलाच फटका बसलेला आहे. त्यामुळे बागायतीचे मोठे नुकसान झालेले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सतत ही परिस्थिती निर्माण होत असल्याने खर्च आणि उत्पन्नाचा मेळ बसविताना बागायतदारांची दमछाक झाली आहे.
या स्थितीत शेतकऱ्यांना शासनाच्या पीक विम्याच्या संरक्षणाची हमी मिळेल अशी आशा होती. मात्र यावर्षी त्यांना नुकसान भरपाईच मिळालेली नाही. त्यामुळे बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. भू हे महसुली मंडळ पूर्वीपासून गोवळ किंवा राजापूर या मंडळाशी जोडलेले होते. तसेच भू मंडळाजवळील हवामानमापक केंद्र ओणी व गोवळ हे केंद्र सोडून कृषी विभागाने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता लांजा तालुक्यातील हर्चे या हवामानमापक केंद्राला जोडले. त्यामुळे ओणी व गोवळ परिसरातील बागायतदारांना विम्यासाठी आवश्यक ट्रिगर अॅक्टिव्ह झाले होते. परंतु भू आणि परिसर हर्चेला जोडलेला असल्यामुळे तेथील ट्रिगर अॅक्टिव्ह झालेले नाहीत. त्यामुळे येथील बागायतदार पीक विमा नुकसान भरपाईपासून वंचित राहिलेले आहेत. शासन निकषानुसार बागायतदारांनी पीक विम्याचा हफ्ता भरलेला होता. तरीही लाभ मिळालेला नाही. त्यामुळे महसूली निकषानुसार नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. यावर विमा कंपनी कोणता निर्णय घेणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.