पुढील मे महिना ठाकरेंच्या शाब्दिक तोफांनी धडाडणार आहे. मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे एकाचवेळी कोकणात येत आहेत. उद्धव ठाकरे यांची महाड येथे जाहीर सभा होणार असून राज ठाकरे यांची रत्नागिरी जिल्ह्यात सभा होणार आहे. विशेष म्हणजे एकाच दिवशी ६ मे रोजी या सभा होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. कोकण म्हणजे शिवसेनेचा मजबूत गड मानला जातो. परंतु एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले आणि शिवसेना पूर्ण दुभंगली. त्याचे हादरे कोकणात सर्वाधिक बसले. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यातून शिवसेनेचे आमदार शिंदे यांच्या पक्षात गेले तर त्यांचे समर्थक व काही पदाधिकारी देखील त्यांच्या बरोबर गेले. साहजिकच ठाकरे गटाची ताकद कमी झाली. परंतु शिवसेना आणि ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आजही कोकणात आहे. हा वर्ग आपल्याकडे कायम रहावा तसेच सोडून गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघात डॅमेजकंट्रोल करण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे मैदानात उतरले असून खेड येथे जाहीर सभा घेऊन डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न त्यांनी यशस्वी करून दाखवला आहे.

महाडमध्ये तोफ धडाडणार आता रायगड जिल्ह्यातील महाड मतदार संघात ठाकरे गटाने लक्ष वें द्रत केले असून येथे देखील जाहीर सेनेचे आयोजन  करण्यात आले आहे. खेडमध्ये माजी आमदार संजय कदम यांना पक्षात घेऊन आमदार योगेश कदम यांना शह देण्याची तयारी करण्यात आली. त्याचप्रमाणे आता आमदार भरत गोगावले यांना शह देण्याची तयारी करण्यात आली आहे. या सभेत महाडचे माजी आमदार काँग्रेस नेते स्व. माणिकराव जगताप यांच्या सुकन्या माजी नगराध्यक्षा ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. तशी जोरदार चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळालेळा नाही. मात्र ६ मे रोजी महाडमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा निश्चित करण्यात आली आहे.

राज ठाकरे ६ मे रोजी कोकणात कोकणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे – यांना मानणारा वर्ग मोठा आहे. परंतु दुर्दैवाने येथे पक्ष बांधणीसाठी त्यांना अद्याप तरी यश येताना दिसत नाही. स्थानिक पातळीवर प्रत्येक ठिकाणी असलेले किरकोळ वाद, कुरघोडीचे राजकारण यामुळे कोकणातील मनसे मजबूत होण्यास खो बसत राहिला आहे. व अनेक नवीन तरुण, पदाधिकारी पक्षात येतात परंतु त्यांना वाव मिळत नसल्याने परत जातात. तसेच वरिष्ठ नेत्यांकडून देखील येथे पक्ष बांधणीसाठी हवे तसे ठोस’ प्रयत्न अद्याप तरी होताना दिसत नाहीत. परिणामी कोकणात मनसे मर्यादित राहिली आहे.

कोकण दौऱ्यावर – आता मात्र रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्ष मजबुतीने उभा करण्यासाठी स्वतः राज ठाकरे मैदानात उतरले असून मे महिन्यात त्यांनी कोकण दौरा आयोजित केला आहे. मागील दौऱ्यात त्यांनी येथील पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावतानाच कोकणात मला जाहीर सभा घ्यायची आहे. त्याची तयारी करा. जागा निश्चित करा, मी येतो असे स्पष्ट केले होते. तसेच कोकणातील संघटनेत मला काही बदल करावेच लागतील असे सूचक वक्तव्य देखील केले होते. त्या अनुषंगाने ते कोकण दौऱ्यावर येत आहेत.

चिपळूण, रत्नागिरी की सिंधुदुर्ग? –  राज ठाकरे यांची जाहीर सभा ६ मे रोजी कोकणात आयोजित करण्यात आली आहे. मात्र अद्याप ठिकाण निश्चित झालेले नाही. चिपळूण, रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग येथील एखादे ठिकाण येत्या काही दिवसात निश्चित केले जाणार असून मनसे नेते व पदाधिकारी त्यासाठी नियोजन करत आहेत. कोकणात राज ठाकरे यांची ही पहिलीच जाहीर सभा असणार आहे. विशेष म्हणजे एकाच वेळी दोन्ही ठाकरे बंधू कोकणात येण्याची ही पहिलीच वेळ असून बहुदा एकाच दिवशी दोघांच्या जाहीर सभा कोकणात होण्याची शक्यत असल्याने ठाकरी तोफांनी कोकण दणाणून जाणार आहे.