लांजाच्या उपनगराध्यक्षा आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नगरसेविका पूर्वा मुळे यांच्याविरूद्ध दाखल झालेला अविश्वासाचा ठराव सोमवारी १३-० मतांनी मंजूर झाला. शिवसेना ठाकरे गटाच्या चारही नगरसेवकांनी मतदान प्रक्रियेत सहभागी न होता मतदान प्रक्रियेवर बहिष्कार घातला. तर शिंदे गट, काँग्रेस व भाजप या पक्षाच्या १३ नगरसेवकांनी मतदान करत हा अविश्वास ठराव बहुमताने मंजूर केला.दरम्यान, आपले म्हणणे ऐकून न घेता केवळ बहुमताच्या जोरावर हा अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला, असा आरोप ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी पत्रकारांशी बोलताना केला. त्यामुळे संतप्त झालेले ठाकरे गटाचे नगरसेवक घोषणाबाजी करत सभागृहातून बाहेर पडल्याने सभागृहातील वातावरण काही काळ तापले होते. शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांच्याविरोधात नगरपंचायत कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.

विशेष सभा – या अविश्वासाच्या प्रस्तावावर मतदान घेण्यासाठी सोमवारी १७ एप्रिल रोजी लांजा नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. या सभेला नगराध्यक्ष मनोहर बाईत आणि शिंदे गटाचे काँग्रेसचे ५, २ भाजपचे ३ तसेच अपक्ष २ असे मिळून १२ नगरसेवक उपस्थित होते. तर ठाकरे गटाच्या उपनगराध्यक्षा पूर्वा मुळे यांच्यासह ४ नगरसेवक उपस्थित होते. या सभेत शिवसेना ठाकरे गटाच्या उपनगराध्यक्षा पूर्वा मुळे यांच्यावरील अविश्वास ठराव हा १३ विरुद्ध मतांनी मंजूर करण्यात आला. यामध्ये नगराध्यक्षांचे मतही आहे.

ठाकरे गटाचा बहिष्कार – ठाकरे गटाच्या नगरसेवकांचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेतल्याने या मतदान प्रक्रियेत ठाकरे गटाच्या चारही नगरसेवकांनी सहभाग घेतला नाही. त्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे हा अविश्वास ठराव १३ विरुद्ध अशा बहुमतांनी मंजूर करण्यात आला.

ठाकरे गटाची घोषणाबाजी – दरम्यान, उपनगराध्यक्षा पूर्वा मुळे यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी करत सभागृहाबाहेर पडले. त्यानंतर नगरपंचायत कार्यालयासमोरच ठाकरे गटाच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

पन्नास खोके… एकदम ओके निषेध असो – …. निषेध असो….नगराध्यक्ष मनोहर बाईत यांचा निषेध असो…. पन्नास खोके, एकदम ओके…. झिंदाबाद… झिंदाबाद… शिवसेना झिंदाबाद, उद्धव ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है…..अशा जोरदार घोषणा यावेळी ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी देत नगरपंचायत कार्यालय परिसर दणाणून सोडला. त्याचप्रमाणे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या शिंदे गटाच्या नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांनी प्रथम राजीनामा द्यावा आणि मग निवडून येवून दाखवावे असे आव्हान दिले. यावेळी बोलताना पूर्वा मुळे यांनी सांगितले की, हा अविश्वास ठराव संमत करत असताना सभागृहात मला माझे म्हणणे मांडू दिले नाही. बहुमताच्या जोरावर हा अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आपण या प्रकाराचा निषेध करत आहोत.

अनेकांची उपस्थिती – यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संदीप दळवी, उपतालुकाप्रमुख सुरेश करंबेळे, नगरसेवक स्वरूप गुरव लहू कांबळे, राजू हळदणकर, यामिनी जोईल, शहरप्रमुख नागेश कुरूप, महिल आघाडी तालुकाध्यक्षा लिला घडशी महिला आघाडी शहर संघटक छाया गांगण, माजी जि.प. सदस्या स्वरूपा साळवी, माजी पं.स. सदस्या मानसी आंबेकर, प्रियांका रसाळ, युवासेना तालुकाधिकारी प्रसाद माने, पदाधिकारी राहुल शिंदे, सचिन लिंगायत, ज्येष्ठ शिवसैनिक अनिल शेलार, सुभाष पवार, नितीन शेट्ये, चंद्रकांत शिंदे यांच्यासह वैभव जोईल, लक्ष्मण मोर्ये आदी उपस्थित होते.

मुळेंवर नगराध्यक्षांचा आरोप – दरम्यान, या अविश्वास ठरावानंतर नगराध्यक्ष मनोहर बाईत यांनी सर्व १२ नगरसेवकांसह पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका मांडली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, उपनगराध्यक्षा पुर्वा मुळे या गेले काही दिवस मनमानी कारभार करत होत्या. त्यामुळेच सर्व नगरसेवकांनी त्यांच्या विरोधात आपल्याला निवेदन सादर केले होते. त्यावरूनच या विशेष सभेचा अजेंडा काढण्यात आला होता. आपल्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नव्हता. पूर्वा मुळे यांनी कोणालाही विश्वासात न घेता मनमानी कारभार केल्याने आज त्यांच्यावर ही वेळ आली आहे, असे नगराध्यक्ष मनोहर बाईत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.