मंदिरांचे गाव म्हणून संपूर्ण कोकणात विशेष ओळख असलेल्या राजापूर तालुक्यातील रायपाटण येथे कार्त्तिकी एकादशीच्या निमित्ताने एक अत्यंत आनंदाची आणि भक्तीमय बातमी समोर आली आहे. रायपाटणमधील पुरातन श्री विठ्ठल-रुखमाई देवस्थानात २० ते २२ नोव्हेंबर २०२६ या तीन दिवशीय कालावधीत कार्त्तिकी उत्सवाचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले आहे.
सध्या या ऐतिहासिक आणि श्रद्धास्थान असलेल्या मंदिराचा जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. अशातच या भव्य उत्सवामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण पाहायला मिळत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात दररोज सकाळी नित्यपूजा, कीर्तन, भजन, रात्री आरत्या, तसेच विशेषत्वाने शालेय विद्यार्थ्यांची दिंडी आणि वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.
तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रमांचे भरगच्च स्वरूप:
-
शुक्रवार, २० नोव्हेंबर २०२६ (शुभारंभ): सकाळी ८ वाजता देवाची नित्यपूजा होणार असून रात्री ८ वाजता आरत्या व भोवत्या खेळल्या जातील. त्यानंतर रात्री १० वाजता ह.भ.प्र. गिरजा करंबळकर यांचे सुश्राव्य कीर्तन पार पडेल.
-
शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६: सकाळी ८ वाजता नित्यपूजा झाल्यानंतर सकाळी ८:३० वाजता परिसरातील शालेय विद्यार्थ्यांची उत्साही दिंडी निघेल. सायंकाळी ५ वाजता ह.भ.प्र. गिरजा करंबळकर यांचे दुसरे कीर्तन होईल, तर रात्री ९ वाजता पारंपरिक वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री १० वाजता नियमित आरत्या व भोवत्यांनी दिवस संपेल.
-
रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ (समापन सोहळा): उत्सवाच्या शेवटच्या दिवशी सकाळी ८ वाजता नित्यपूजा झाल्यावर दुपारी १ वाजता भाविकांसाठी महाप्रसादाचा लाभ असेल. सायंकाळी ५ वाजता कीर्तन, ६ वाजता गोपालकाला, रात्री १० वाजता आरत्या आणि रात्री ७ वाजता ‘लळीत कीर्तना’ने या तीन दिवसीय धार्मिक उत्सवाची सांगता होईल.
या सर्व कार्यक्रमांमध्ये संगीताची जोड म्हणून संवादिनीवर सतीश करंबळकर व गणेश लले, तर तबल्यावर प्रशांत जोशी उत्तम सहसंगत करणार आहेत. देवस्थान ट्रस्टच्या वतीने परिसरातील सर्व भाविकांना, वारकऱ्यांना आणि नागरिकांना या धार्मिक महोत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आदरयुक्त आवाहन करण्यात आले आहे.

