कलकत्ता हायकोर्टात रणवीर सिंगच्या विरोधात जनहित याचिका दाखल करताना याचिकाकर्त्याने पश्चिम बंगाल सरकार आणि या प्रकरणाशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना रणवीर सिंगचे २३ तारखेला प्रकाशित केलेले फोटोशूट असलेल्या पेपर मॅगझिनच्या सर्व छापील प्रती जप्त करण्याचे निर्देश देण्याची विनंती केली आहे. यासोबतच पश्चिम बंगाल राज्यातील इंटरनॅशनल मॅगझिनची वेबसाईट ब्लॉक करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.
अभिनेता रणवीर सिंग आता न्यूड फोटोशूट प्रकरणात अडचणीत सापडला आहे. एफआयआरनंतर आता रणवीर सिंगविरोधात कलकत्ता हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ज्यामध्ये रणवीरचे न्यूड फोटोशूट असलेल्या ‘पेपर मॅगझिन’च्या सर्व छापील प्रती जप्त करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे.
अॅडव्होकेट नाझिया इलाही खान यांनी रणवीरविरोधात ही याचिका दाखल केली आहे. याचिकेत नाझियाने लोकांच्या मोठ्या वर्गाच्या मताच्या आधारे या कलाकारांचे फोटो अश्लील म्हटले आहे. याशिवाय, याचिकेत असाही दावा करण्यात आला आहे की, पश्चिम बंगालमध्ये रणवीरचे फोटोशूट जनतेचे मन मोठ्या प्रमाणावर चुकीच्या दिशेने ढकलत आहे, विशेषत: अल्पवयीन मुलांसाठी.
यापूर्वी रणवीर सिंगविरुद्ध एनजीओ अधिकारी ललित श्याम यांनी मुंबईतील चेंबूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ज्यामध्ये रणवीरने सोशल मीडियावर न्यूड फोटो शेअर करून महिलांच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता. अभिनेत्याने त्याचे काही न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याने हे फोटोशूट पेपर मॅगझिनसाठी केले आहे.
या फोटोशूटमुळे रणवीरला प्रचंड ट्रोल करण्यात आले. अनेक प्रकारचे मीम्सही व्हायरल झाले. मात्र, पत्नी दीपिका पदुकोण, राम गोपाल वर्मा, अर्जुन कपूर, आलिया भट्ट, मसाबा गुप्ता यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी या फोटोशूटवर रणवीरला पाठिंबा दर्शवला आहे.