HomeKokanकोकण रेल्वेची विनातिकीट प्रवाशांवर मोठी कारवाई; एप्रिल महिन्यात ३७,००० प्रवाशांना दंड

कोकण रेल्वेची विनातिकीट प्रवाशांवर मोठी कारवाई; एप्रिल महिन्यात ३७,००० प्रवाशांना दंड

कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने एकाच महिन्यात वसूल केला २.९ कोटींचा दंड; प्रामाणिक प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोहीम तीव्र.

मुंबई: निसर्गरम्य कोकणातून धावणाऱ्या कोकण रेल्वेने विनातिकीट आणि नियमबाह्य प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात आपली मोहीम तीव्र केली आहे. रेल्वे प्रवासात होणारी गर्दी, तिकीट नसतानाही सीट अडवून बसणारे प्रवासी आणि यामुळे प्रामाणिक प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) विशेष पावले उचलली आहेत. नुकत्याच संपलेल्या एप्रिल २०२६ या एकाच महिन्यात रेल्वेने विनातिकीट प्रवाशांवर मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल केला आहे.

एका महिन्यात ९३० हून अधिक मोहिमा कोकण रेल्वेने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, एप्रिल महिन्यात नियमित तपासणीसोबतच एकूण ९३४ विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबवण्यात आल्या. या धडक मोहिमेदरम्यान रेल्वेच्या तिकीट परीक्षकांनी (TC) विविध गाड्यांमध्ये आणि स्थानकांवर झाडाझडती घेतली. यादरम्यान तब्बल ३७,००० प्रवासी विनातिकीट किंवा अनियमितपणे (उदा. जनरल तिकीट काढून आरक्षित डब्यातून) प्रवास करताना रंगेहात पकडले गेले. या बेशिस्त प्रवाशांकडून रेल्वेने तब्बल २.९ कोटी रुपयांचा महसूल भाडे आणि दंडाच्या स्वरूपात वसूल केला आहे.

वार्षिक कारवाईचा आकडा थक्क करणारा कोकण रेल्वेने केवळ एका महिन्यातच नव्हे, तर वर्षभरात अशा फुकट्या प्रवाशांना चांगलाच इंगा दाखवला आहे. गेल्या आर्थिक वर्षात (२०२५-२६) रेल्वेने अशा तब्बल ११,३९४ विशेष मोहिमा राबवल्या होत्या. या संपूर्ण वर्षात तब्बल ४,९९,६७५ (जवळपास ५ लाख) विनातिकीट प्रवासी पकडले गेले असून, त्यांच्याकडून २७.६८ कोटी रुपयांचा दणदणीत दंड वसूल करण्यात आला आहे.

प्रामाणिक प्रवाशांच्या सुटकेचा श्वास अनेकदा ऐन हंगामात तिकीट आरक्षित करूनही केवळ विनातिकीट प्रवाशांच्या गर्दीमुळे प्रामाणिक प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, रेल्वेचा महसूल वाढवण्यासोबतच नियमित आणि वैध तिकीट घेणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा, याच उद्देशाने ही कडक कारवाई केली जात आहे. आगामी काळातही ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याने, प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वेने केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular