तब्बल दहा वर्षानंतर रत्नागिरी शहरात पुन्हा एकदा. वाहतुकीचे नियमन करण्यासाठी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होणार असून ५५ लाख रूपये खर्च करुन कोल्हापूरच्या धर्तीवर अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा सुरू होणार आहे. यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असून शहरातील चार ठिकाणी हे सिग्नल सुरू होणार आहेत. रत्नागिरी शहरातील वाहनधारकांना आता नेहमीच्या सिग्नलपेक्षा अनोखे सिग्नल वाहतुकीचे नियम दाखविणार आहेत. एलईडी पोल असे या सिग्नलचे नाव असून जो सिग्नल लागेल त्या रंगाची आडवी स्ट्रीप पेटणार आहे. कोल्हापूरसह अन्य शहरांच्या धर्तीवर रत्नागिरी पालिकेने हे ५५ लाखाचे नवे सिग्नल शहरात बसवायला सुरुवात केली आहे. येत्या दोन ते चार दिवसामध्ये त्यापैकी दोन सुरू होणार आहेत.
रत्नागिरी शहरातील सिग्नल व्यवस्था गेल्या १० वर्षांपासून ठप्प आहे. नगर परिषदेने २१ लाख रुपये खर्च करून बंद पडलेली सिग्नल यंत्रणा तत्कालीन शिवसेनेच्या सत्ताधाऱ्यांनी पुन्हा सुरू केली. परंतु नव्याचे नऊ दिवस याप्रमाणे नवीन सिग्नल काही दिवस चालले. त्यानंतर हे सिग्नल कधीही लागायचे आणि कधीही बंद व्हायचे. त्यामुळे वाहन धारकांमध्ये गोंधळ निर्माण होत होता. त्यामुळे वाहतूक यंत्रणेच्या सूचनेनुसार सिग्नल बंद करण्यात आले ते आजतागायत बंद आहेत. बंद सिग्नल यंत्रणेमुळे शहरात प्रचंड वाहतूक कोडी होते. अनेकवेळा अपघातही झाले आहेत. त्यामुळे नगर परिषदेने लवकरात लवकर सिग्नल यंत्रणा बसवावी, अशी मागणी होत होती. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्या पुढाकारानंतर नवीन आणि आधुनिक सिग्लन यंत्रणा उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला.
याला नगरोत्थान योजनेतून ५५ लाख रुपये मंजूर झाले. पुणे येथील जे. पी. ट्रॅफिक कंट्रोल या एजन्सीला त्याचा ठेका दिला. परंतु यावेळी वेगळ्या पद्धतीचे आधुनिक पद्धतीचे एलईडी स्ट्रीप पोल बसविण्यात येत आहेत. यामध्ये सिग्नलच्या पोलला आड़वा बार आहे. जो सिग्नल पडेल त्या रंगाचा तो आडवा बार पेटणार आहे. त्यामुळे वाहनधारकाला सिग्नल पडल्याचे सहज लक्षात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जेल नाका, राम नाका, जयस्तंभ आणि मारुती मंदिर येथे हे सिग्नल बसविण्यात येणार आहेत. नगरोत्थानमधून सिग्नलसाठी ५५ कोटीचा निधी मिळाला होता. त्यातून हे आधुनिक सिग्नल बसविण्याचे काम सुरू झाले आहे. दोन दिवसात पहिल्या टप्प्यात जेलनाका येथील सिग्नल सुरू होतील अशी माहिती मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी दिली आहे.