रत्नागिरी जिल्ह्यात जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे, वाहुन गेलेल्या जिल्ह्यातील १०२ साकवांची पुनर्बांधणी आणि मजबुतीकरणासाठी २३ कोटी ४५ लाखाची निधी लवकरच वितरित होणार आहे. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. अनिल परब आणि खासदार विनायक राऊत यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली. तातडीने हा निधी वितरित केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले.
जिल्ह्यात २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत साकव मोठ्या प्रमाणात नादुरूस्त झाले आहेत तर काही पूर्णच्या पूर्ण वाहुन गेले आहेत. त्यामुळे पावसाळ्याआधी त्याची डागडुजी, दुरुस्ती करणे गरजेचे असल्याने आवश्यक निधीची तरतूद होण्यासाठी पुनर्वसन मंत्र्यांची भेट घेण्यात आली.
महापुरामुळे त्यावेळी बऱ्याच ठिकाणी गावे, वाड्यांचा संपर्क तुटला होता. विशेषतः पावसाळ्यामध्ये नद्या, नाले, ओढे यांना मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने ग्रामस्थ व शाळकरी विदयार्थ्यांना अन्य पर्यायी मार्ग नसल्याने ये-जा करण्यासाठी किंवा वाहतुकीच्या दृष्टीने अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे तुटलेल्या तसेच वाहुन गेलेल्या साकवांच दुरूस्ती, पुनर्बांधणी करणे अतिशय आवश्यक बनले आहे.
गेल्या महिन्यात यासदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आढावा बैठक घेण्यात आली. त्यामध्ये साकवांच्या पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार २०२१ च्या अतिवृष्टीमध्ये नादुरूस्त झालेल्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडीन ३९ साकवांसाठी १४ कोटी ९ व जिल्हा परिषद चिपळूण कडील ६३ साकवांसाठी ९ कोटी ३५ लाख असा एकुण १०२ साकवांच्या दुरूस्ती आणि पुनर्बांधणीसाठी २३ कोटी ४५ लाख निधीची आवश्यकता आहे, तरी त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा, असा प्रस्ताव देण्यात आला होता.