सरकारी योजना या कागदोपत्रीच जास्त राहतात, असे म्हणतात. आणि याचा फटका मात्र सर्व सामान्य जनतेला सोसावा लागतो. मागील वर्षापासून सुरु असलेला लॉकडाऊन आणि त्यामुळे घरामध्ये बसलेला शेतकरी वर्ग, आता शेतीचा हंगाम सुरु झाल्याने कामाला जोमाने लागला आहे. परंतु, समोर एक ना अनेक अडचणी आ वासून आहेत. एकतर लॉकडाऊन असल्याने ग्रामीण भागातील शेतकर्यांना प्रवास करण्यासाठी वाहन उपलब्ध नाही, त्यात शासकीय कृषी कामांची वेळ ठरवून दिलेली असल्याने वेळेत कामे कशी पूर्ण करायची असा प्रश्न सामान्य शेतकरी वर्गाला पडला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील बवीआचे जिल्हाध्यक्ष आणि एक शेतकरी असलेले तानाजी कुळ्ये यांनी शासनाच्या या अनागोंदी कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेतकर्याने नक्की जगावे तरी कसे ! पावसाला सुरुवात झाल्याने खरीप शेती हंगामाला शेतकऱ्यानी श्रीगणेशा केला. शेतीसाठी कर्ज काढून शेतकर्यांनी पॉवर ट्रीलर सारखी अत्याधुनिक यंत्र अवजारे खरेदी केली. परंतु, लॉकडाऊन काळात फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांनाच पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल-डीझेल दिले जात असल्याने, इतरांना पेट्रोल-डीझेल देणे शासनाने बंद केले आहे. तसेच पेट्रोल पंपावर त्यासाठी एक पोलीस कर्मचारीही पाळत ठेवून असल्याने कुठूनही पेट्रोल शेतकऱ्याला मिळू नये याचा चोख बंदोबस्त केल्याची खरमरीत टीका तानाजी कुळ्येनी केली आहे.
जिथे लॉकडाऊन संबंधी निर्णय घेताना जर व्यापारी संघटनाशी चर्चा केली जात आहे, तर सामान्य शेतकऱ्यांशी चर्चा कधी केली जाणार ! असा सवाल कुळ्ये यांनी केला आहे. जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला वेळ मिळणार आहे का ! शेतीचा हंगाम सुरु झाला तरी त्याचे नियोजन शून्यच आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस आणि आम्हीच निवडून दिलेले लोकप्रतिनीधी यांनी कृपया शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष देऊन गावातील तलाठी आणि ग्रामसेवकांमार्फत आवश्यक ती मदत उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती केली आहे.