रत्नागिरी: आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा प्रभावी वापर आणि जनतेशी जोडलेली सामाजिक बांधिलकी यांच्या जोरावर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या उत्कृष्ट व पारदर्शक कामगिरीचा डंका वाजवला आहे. पोलीस दलाच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमांची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली असून, रत्नागिरी पोलिसांना अतिशय मानाच्या ‘ई-गव्हर्नन्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ही अभिमानास्पद माहिती दिली.
२९ सामाजिक उपक्रमांतून जनसेवेचा वसा
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, रत्नागिरी पोलीस केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्यापुरते मर्यादित न राहता सध्या तब्बल २९ विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत.
-
मिशन रायझिंग फ्लॉवर: या विशेष अभियानाद्वारे जिल्ह्यातील तब्बल २ लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांचे प्रबोधन करण्यात पोलिसांना यश आले आहे.
-
मिशन जीवन: ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि मदतीसाठी ‘मिशन जीवन’अंतर्गत एक मोठा डेटाबेस तयार करण्यात आला आहे. यामुळे वृद्धांच्या समस्या प्राधान्यक्रमाने सोडवणे शक्य झाले आहे.
‘रेड्स’ (REDS) ॲपची किमया: २० वर्षे फरार असलेला आरोपी जाळ्यात!
गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी राष्ट्रीय पातळीवरील ‘REDS’ ॲपचा अत्यंत प्रभावी वापर केला आहे. या तंत्रज्ञानामुळे:
-
बेपत्ता झालेली मुले व मुलींचा शोध घेणे सोपे झाले.
-
अज्ञात मृतदेहांची ओळख पटवण्यात गती मिळाली.
-
इतर भागांतून येऊन गुन्हे करणाऱ्या टोळ्या व खूनाच्या केसेसची उकल करण्यात यश आले.
याच ॲपच्या मदतीने खेड येथील एका खूनाच्या गुन्ह्यात तब्बल २० वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले, ही या तंत्रज्ञानाची सर्वात मोठी यशोगाथा ठरली आहे.
‘अधिनिर्णय’ अन् ‘मिशन रॅपिड’: तपासाची गुणवत्ता वाढवणारे नवीन डिजिटल हत्यार
डिजिटल विश्वात आणखी एक पाऊल पुढे टाकत रत्नागिरी पोलिसांनी ‘अधिनिर्णय’ आणि ‘मिशन रॅपिड’ या दोन अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रमांची घोषणा केली आहे.
-
‘अधिनिर्णय’ ॲप (देशातील पहिलाच प्रयोग):
न्यायालयात सुटणाऱ्या किंवा निर्दोष मुक्तता होणाऱ्या केसेसमधील निकालांचे सविस्तर विश्लेषण पोलिसांना एकाच फॉर्मॅटमध्ये मिळण्यासाठी हे ॲप तयार करण्यात आले आहे. तपासात नक्की काय चुका झाल्या, पुरावे कुठे कमी पडले आणि आरोपी कसे सुटले? याचे अचूक विश्लेषण या ॲपद्वारे पोलिसांना मिळेल. यामुळे भविष्यात पोलिसांना भक्कम दोषारोपपत्र (Charge Sheet) दाखल करण्यास आणि तपासाची गुणवत्ता उंचावण्यास मदत होणार आहे.
AI तंत्रज्ञानाने गुन्हेगारीवर वचक
रत्नागिरी पोलीस दल कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात राज्यातील आघाडीचे पोलीस दल ठरले आहे. तंत्रज्ञानाच्या या स्मार्ट वापरामुळे गुन्हेगारीवर कडक वचक बसवणे आणि लोककल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवणे शक्य झाले आहे. याच ‘ई-गव्हर्नन्स’ मॉडेलमुळे आज रत्नागिरी पोलीस दलाची मान संपूर्ण राज्यात उंचावली आहे.

