HomeRatnagiriरानभाज्यांचा स्वाद आता वर्षभर? रत्नागिरीत रानभाजी महोत्सवाचा अनोखा उत्साह; पालकमंत्री उदय सामंत...

रानभाज्यांचा स्वाद आता वर्षभर? रत्नागिरीत रानभाजी महोत्सवाचा अनोखा उत्साह; पालकमंत्री उदय सामंत यांचे कृषी विद्यापीठांना आवाहन

रत्नागिरीत जिल्हास्तरीय रानभाजी व पौष्टिक तृणधान्य महोत्सवात 'रानपिझ्झा' आणि 'पौष्टिक फालुदा' ठरले आकर्षण; पाककला व रील स्पर्धांचे निकाल जाहीर

रत्नागिरी: पावसाळा सुरू झाला की कोकणातील डोंगर-दऱ्यांमध्ये निसर्गाचा अनमोल ठेवा असलेल्या पौष्टिक आणि औषधी रानभाज्या बहरू लागतात. मात्र, अवघ्या दोन-अडीच महिन्यांपुरता मर्यादित असलेला हा रानभाज्यांचा आस्वाद खवय्यांना वर्षभर कसा घेता येईल, यावर आता भर दिला जाणार आहे. रानभाज्या केवळ काही दिवसांच्या महोत्सवापुरत्या मर्यादित न राहता त्या वर्षभर उपलब्ध होण्यासाठी कृषी विद्यापीठांनी आधुनिक प्रक्रिया तंत्रज्ञानावर संशोधन करावे, असे महत्त्वपूर्ण आवाहन रत्नागिरीचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.

रत्नागिरीत कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (ATMA – आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी व पौष्टिक तृणधान्य महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

महिला बचत गटांना मिळणार हक्काची बाजारपेठ व निधी

यावेळी बोलताना पालकमंत्री उदय सामंत यांनी रानभाज्यांचे व्यावसायिक महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “पावसाळ्यात मिळणाऱ्या या अत्यंत गुणकारी भाज्या महिला बचत गटांच्या माध्यमातून आठवडाभर चालणाऱ्या विशेष उपाहारगृहांद्वारे खवय्यांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. अशा अभिनव प्रयोगांमुळे महिलांना शाश्वत रोजगाराची संधी मिळेल.” बचत गटांच्या अशा उपक्रमांना शासनाकडून सर्वतोपरी निधी व सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

चविष्ट रानपिझ्झा ते पौष्टिक फालुदा: महोत्सवात पारंपरिकतेला आधुनिकतेचा तडका

या महोत्सवात विविध गावांतून आलेल्या शेतकरी आणि महिलांनी मांडलेले स्टॉल्स विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. मान्यवरांनी स्वतः विविध स्टॉल्सना भेट देऊन पारंपरिक व नावीन्यपूर्ण पदार्थांची चव चाखली. यामध्ये ‘गुरुवर्य रा. पु. जोग संजीवन गुरुकुल’च्या शाळकरी विद्यार्थ्यांच्या स्टॉलने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

या निमित्ताने आयोजित पाककला आणि सोशल मीडिया रील स्पर्धांमध्ये स्पर्धकांनी आपल्या कल्पकतेने तयार केलेले पदार्थ सादर केले.

स्पर्धांमधील विजेत्यांची नामावली:

१. रानभाजी पाककला स्पर्धा

  • प्रथम क्रमांक: संयुक्ता विशाल मोरे (नरवण, ता. गुहागर) – पदार्थ: वाफवलेला थ्री लेअर रानपिझ्झा

  • द्वितीय क्रमांक: स्वप्नाली संजय भागवत (लांजा) – पदार्थ: रानभाजी नूडल्स व लाडू

  • तृतीय क्रमांक: सौ. प्रज्ञा जयंत फडके (जांभूळआड, रत्नागिरी) – पदार्थ: राणदात्री

२. पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धा

  • प्रथम क्रमांक: वैशाली श्रीपाद देवदास (रत्नागिरी) – पदार्थ: बाजरीची पौष्टिक खिचडी

  • द्वितीय क्रमांक: सौ. साक्षी सम्राट पाटील (रत्नागिरी) – पदार्थ: पौष्टिक फालुदा

  • तृतीय क्रमांक: स्वाती सुनील पारकर (रत्नागिरी) – पदार्थ: प्रोटीनयुक्त नाचणी लाडू

३. रानभाजी रील (Reel) स्पर्धा

  • प्रथम क्रमांक: निकिता संदीप नाचणेकर (कोदवली, ता. राजापूर)

  • द्वितीय क्रमांक: उल्का पटवर्धन (नाचणे, रत्नागिरी)

  • तृतीय क्रमांक: साहिल राजेंद्र सकपाळ (खेड)

  • उत्तेजनार्थ: वैभव आमरे (राजापूर) आणि अनुष्का मोहिते (खेड)

उपस्थित मान्यवर:

या उद्घाटन सोहळ्याला जिल्हाधिकारी मनुज जिंदल, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता केंद्रे, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, आमदार किरण सामंत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले तसेच ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक विजय बेतिवार यांच्यासह कृषी अधिकारी, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Use up and down arrow keys to resize the meta box pane.

Use up and down arrow keys to resize the meta box pane.

RELATED ARTICLES

Most Popular