मुंबई आणि कोकण जिंकायचे असेल राजापूर येथे होऊ घातलेल्या रिफायनरीच्या विरोधात रान उठवा, आंदोलन करा, असे स्पष्ट आदेश शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर घेतलेल्या एका गोपनीय बैठकीत दिल्याची चर्चा सेनाभवनात ऐकायला मिळत आहे. यावेळी कोकणातील जिल्हा प्रमुख, खासदार, आमदार आणि पदाधिकारी, उपस्थित होते. ही बैठक ठाकरे हे परदेशात जाण्यापूर्वी पार पडली, अंशीही चर्चा आहे.
मुख्यंमत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारानी बंड केल्यानंतर एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात तीन आमदार शिल्लक आहेत. यामध्ये राजन साळवी, वैभव नाईक आणि भास्कर जाधव यांचा समावेश आहे. तसेच मुंबईतील काही आमदार शिंदे गटात गेल्याने ठाकरे गटाला आपल्या राजकीय भवितव्याबाबत चिंता आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारसू येथील रीफायनरीच्या पाठिंब्याच पत्र दिल्याने कोकणी मतदार ठाकरे गटाकडून दूर जातात की काय? याची चिंता ठाकरे गटाला होती.
राजकीय मुद्दा उठविण्याची रणनीती – सध्या बारसू रिफायनरी विरोधात मुंबईतील चाकरमानी आणि कोकणातील जनतेत तीव्र असंतोष आहे. कोकणी मतदाराला आपल्याकडे वळवून मुंबई आणि कोकण जिंकायचं असेल तर बारसू येथील रिफायनरीला विरोध केला पाहिजे. हे उद्धव ठाकरे यांनी तंतोतंत जाणलं. आणि यु टर्न घेत बारसूच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यांनी बारसूला जाऊन सरकारच्या विरोधात आवाजही दिला. यामुळे कोकण आणि मुंबईच वातावरण ढवळून गेल्याची चर्चा आहे.
मातोश्रीवर गोपनीय बैठक – ठाकरे गट शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच एक बैठक घेतली होती. याची प्रसारमाध्यमांना खबर लागू दिली नाही आणि कुठे कोणी वाच्यता केली नाही. या बैठकीला जिल्हा प्रमुख, खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. रिफायनरी विरोधी संघटनांना सोबत शिवसेनेनेही रिफायनरी विरोधात आंदोलन करावे, रान उठवावे, असे आदेश ठाकरे यांनी दिल्याची चर्चा आहे. मुंबई आणि कोकण जिंकायचं असेल तर हीच वेळ आहे. पुढचे आंदोलन मोठं झालं पाहिजे, अशा सूचना ठाकरे यांनी केल्याची चर्चा सेनाभवनात ऐकायला मिळते.
नाणारच्या आंदोलनाचा आढावा – या बैठकीत मागचे नाणारचे झालेले आंदोलन आणि त्यानंतर रिफायनरी रद्द केल्यावर त्याचा निवडणुकीत शिवसेनेला फायदा किती झाला होता. याचा आढावा घेण्यात आला. खासदार विनायक राऊत हे दिंड लाख मतांनी निवडून आलेले होते. सर्व आमदारही मोठ्या मताने निवडून आले होते. ही किमया नाणार रिफायनरी रद्द केल्याने झाली होती ती पुन्हा संधी आली आहे. राजकीय फायदा उठवायचं असेल तर पुन्हा बाररू रिफायनरीची संधी चालून आलेली आहे. ती दवडू नका असे सांगत ठाकरे यांनी यावेळी मागच्या निवडणुकीचा आढावा घेतल्याची चर्चा ऐकायला मिळते.
राजापूर कार्यकारणीची बैठक – ठाकरे यांच्या बैठकींनंतर राजापूर तालुका शिवसेनेची बैठक पार पडली असे सांगण्यात येते. यावेळी आमदार राजन साळवी हे उपस्थित होते. राजापूर येथे पार पडलेल्या बैठकीत बारसू रिफायनरी विरोधात यापुढे आंदोलन छेडायचा असा निर्णय शिवसेना कार्यकारणीत झाला असल्याची चर्चा आहे.