रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती भाग आणि खरेदीचे प्रमुख केंद्र असलेल्या ‘शनिवार आठवडा बाजारात’ आधुनिक शॉपिंग सेंटर उभारण्याच्या हालचाली नगर परिषदेने वेगाने सुरू केल्या आहेत. या भव्य आणि सर्वसोयींनी युक्त अशा नवीन इमारतीसाठी ७ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मंजुरी देखील मिळालेली आहे. मात्र, निधी उपलब्ध असूनही या प्रकल्पाचे प्रत्यक्ष बांधकाम मात्र सध्या ‘जैसे थे’ स्थितीत आहे. कारण जुन्या इमारतीतील गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतल्याने हे संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ट झाले आहे.
धोकादायक इमारत आणि गाळेधारकांचा कायदेशीर लढा
शनिवार आठवडा बाजारातील जुनी शॉपिंग सेंटरची इमारत ही अत्यंत जिर्ण आणि धोकादायक बनली होती. भविष्यात होणारी दुर्घटना टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून रत्नागिरी नगर परिषदेने काही वर्षांपूर्वीच गाळेधारकांना गाळे रिकामे करण्याच्या कायदेशीर नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, या निर्णयाविरोधात जुन्या गाळेधारकांनी न्यायालयात आव्हान दिले. परिणामी, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे नव्या शॉपिंग सेंटरच्या कामाला ब्रेक लागला आहे.
न्यायालयाच्या निकालानंतर तत्काळ काम सुरू होणार
शासनाच्या ‘वैशिष्ट्यपूर्ण योजने’ अंतर्गत या प्रस्तावित शॉपिंग सेंटरसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. न्यायालयीन निकालाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामात कोणताही प्रशासकीय विलंब होऊ नये, यासाठी नगर परिषदेने आधीच सर्व पूर्वतयारी करून ठेवली आहे. त्यानुसार ७ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे.
कोर्टाचा निकाल लागताच शनिवार बाजारात सर्व सोयी-सुविधांनी सज्ज असे आधुनिक शॉपिंग सेंटर साकारले जाईल आणि शहराच्या वैभवात भर पडेल, अशी आशा नगर परिषद प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.

