रत्नागिरी तालुक्यातील नांदिवडे येथे लोकवस्तीमध्ये जिंदल गॅस टर्मिनल प्रकल्पाचे काम अनधिकृतपणे सुरु असल्याचा आरोप करत त्यावर कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या केबीनबाहेर प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी ठिय्या मांडत धरणे धरले. त्यामुळे प्रशासनाची एकच धावपळ उडाली. शेवटी अप्पर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी योग्य त्या कार्यवाहीसंदर्भात लेखी पत्र दिल्यानंतर हे धरणे आंदोलन मागे घेण्यात आले. नांदिवडे येथील जिंदल गॅस टर्मिनल प्रकल्प स्थलांतरीत करावा यासाठी गेले अनेक महिने ग्रामस्थांकडून प्रयत्न सुरु आहेत. ग्रामस्थांच्या या लढ्याला पाठींबा म्हणून माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्षाने आंदोलनाची हाक दिली होती. मात्र २८ मे रोजी होणारे हे आंदोलन स्थगित करण्यात आले. होते. मात्र बुधवारी प्रहार दिव्यांग क्रांती संस्था व प्रहार जनशक्तीचे पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी आले होते. यावेळी दिव्यांगांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे नांदिवडे येथील गॅस प्रकल्पावरही चर्चा करण्यात आली.
कारवाईची मागणी – नांदिवडे येथे गॅस प्रकल्प उभारताना जिंदल कंपनीने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याचे महाराष्ट्र सागरी महामंडळ मुंबईच्या नगररचना प्र. उपसंचालकांनी पत्र दिले आहे. त्याचप्रमाणे हे काम थांबवण्याचे पत्र जेएसडब्ल्यू पोर्टला दिले आहे. म ात्र त्यानंरही टर्मिनलचे काम सुरु आहे. त्यामुळे या पत्रानुसार गॅस उभारणी प्रकल्पावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. यावर चौकशी करुन त्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले.
केबीनबाहेर ठिय्या – मात्र प्रहार जनशक्तीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या केबीनबाहेरच ठिय्या मांडला. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह निघून गेल्यामुळे प्रहार जनशक्तीचे पदाधिकारी संतप्त झाले व जिल्हाधिकारी निघून जात असताना, न्याय द्यावा म्हणून घोषणा देण्यात आल्या. हा प्रकार रत्नागिरी शहर पोलिसांना समजताच पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर व त्यांचे सहकारी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले.
१० दिवसांत उत्तर – यावेळी अंपर जिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी ठिय्या मांडणाऱ्या कार्यकर्त्यांची समजूत घातली. नांदिवडे येथील गॅस टर्मिनल प्रकल्पाबाबत सर्व विभागांकडून माहिती घेऊन कार्यवाहीबाबत १० दिवसात उत्तर देण्यात येईल, असे लेखी पत्र अप्पर जिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी दिल्यानंतर हे धरणे मागे घेण्यात आले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष अॅड. स्वप्नील पाटील, कोकण विभाग सचिव सुरेश मोकल, प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या ठाणे जिल्हाध्यक्षा काजल नाईक, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी, नांदिवडे माजी सरपंच गुरुनाथ सुर्वे व पदाधिकारी उपस्थित होते.