HomeRatnagiriसंगमेश्वरमध्ये पावसामुळे शास्त्रीपूल-डिंगणी रस्त्याची दुरवस्था; एसटी सेवा दुसऱ्या दिवशीही ठप्प

संगमेश्वरमध्ये पावसामुळे शास्त्रीपूल-डिंगणी रस्त्याची दुरवस्था; एसटी सेवा दुसऱ्या दिवशीही ठप्प

गॅस पाईपलाईनच्या कामातील अनास्थेमुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य; प्रवासी व विद्यार्थी त्रस्त.

संगमेश्वर: नियोजनाचा अभाव आणि प्रशासनाचे दुर्लक्ष विकासाच्या नावाखाली सामान्य नागरिकांसाठी किती त्रासदायक ठरू शकते, याचे जिवंत उदाहरण संगमेश्वरमध्ये पाहायला मिळत आहे. सोमवारी सायंकाळनंतर झालेल्या अवघ्या तासाभराच्या पावसाने संगमेश्वरमधील महत्त्वाच्या शास्त्रीपूल-डिंगणी रस्त्याची अक्षरशः धुळधाण उडवली आहे. गॅस पाईपलाईनच्या बेजबाबदार खोदाईमुळे या रस्त्यावर चिखलाचे प्रचंड साम्राज्य पसरले असून, डिंगणी-करजुवे मार्गावरील एसटी बस सेवा सलग दुसऱ्या दिवशीही पूर्णपणे ठप्प आहे. परिणामी, प्रवासी, शाळकरी विद्यार्थी आणि वाहनचालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

गॅस पाईपलाईनच्या कामामुळे रस्त्याचे झाले चाळण

मागील तब्बल दोन वर्षांपासून या भागात गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, संबंधित ठेकेदाराने निकषांना व सुरक्षिततेच्या नियमांना तिलांजली दिल्याचे दिसून येते. भूमिगत कामासाठी काढलेली माती योग्य पद्धतीने बाजूला न सारता ती रस्त्याच्या कडेला आणि काही ठिकाणी थेट डांबरी रस्त्यावरच ढिगारे करून टाकण्यात आली होती.

सोमवारी संध्याकाळी अचानक आलेल्या पावसामुळे हीच माती पाण्यात मिसळून संपूर्ण रस्त्यावर पसरली. ढोले स्टॉप परिसरासह पुढील काही किलोमीटरपर्यंतचा रस्ता पूर्णपणे अदृश्य होऊन तिथे एक ते दोन फूट खोल चिखलाचे लोण तयार झाले. या धोकादायक चिखलात दुचाकी, रिक्षांपासून ते चारचाकी वाहने आणि एसटी बसेसपर्यंत सर्वच वाहने रुतून बसल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे कोलमडली.

ग्रामीण भागाशी संपर्क तुटल्याने प्रवाशांचे अहोरात्र हाल

रस्त्याच्या या अत्यंत दयनीय परिस्थितीमुळे डिंगणी-करजुवे मार्गावर प्रवाशांची ने-आण करणाऱ्या एसटी बसेसच्या फेऱ्या सलग दुसऱ्या दिवशीही रद्द कराव्या लागल्या आहेत. ग्रामीण भागातील रुग्ण, नोकरदार वर्ग आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुरक्षेच्या कारणास्तव नाइिलाजास्तव पायपीट करावी लागत आहे. बसफेऱ्या बंद राहिल्याने एसटी महामंडळाच्या महसुलावरही मोठा विपरीत परिणाम झाला आहे. “ठेकेदाराच्या अशा मनमानी कारभारामुळे एसटी प्रशासनाला आणि महामंडळाला होणाऱ्या आर्थिक नुकसानीची भरपाई संबंधित ठेकेदाराकडून वसूल केली जाणार का?” असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.

ग्रामस्थांचा संताप आणि प्रशासनाकडे कारवाईची मागणी

स्थानिक नागरिक, पालक आणि विद्यार्थ्यांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोणतीही पुरेशी खबरदारी न घेता किंवा प्रशासकीय देखरेख न ठेवता अशा प्रकारे विकासकामे सुरू ठेवल्याने लोकांच्या जिवाशी खेळ चालला असल्याची भावना व्यक्त होत आहे. संबंधित ठेकेदाराने तातडीने पावले उचलून रस्त्यावरील चिखल व माती हटवावी आणि रस्ता पूर्ववत वाहतुकीसाठी खुला करावा, तसेच धोकादायक वळणांवर तात्काळ सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, अशी आक्रमक मागणी आता ग्रामस्थांकडून केली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular