तालुक्यात दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. त्यामुळे तालुक्यात पाणीटंचाईची दाहकता वाढण्याची चिन्हे आहेत. तालुक्याचा टंचाई आराखडा अद्याप निश्चित झालेला नाही. टंचाई आराखड्यास दोन्ही आमदारांची तारीख मिळाल्यानंतर २ जानेवारीला पंचायत समितीत टंचाई आराखडा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. टंचाई आराखडा तयार होण्यापूर्वीच पाणीटंचाईची झळ बसणाऱ्या सावर्डे आणि टेरव गावाने टँकर सुरू करण्याची मागणी केली आहे. तालुक्यात सरासरी चार ते साडेचार हजार मिमी पाऊस कोसळतो; मात्र तरीही फेब्रुवारी संपला की, ग्रामीण भागात पाणीटंचाईचे चटके जाणवायला सुरवात होते.
यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने तालुक्यात पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण होणार आहे. त्याची सुरुवात टेव, सावर्डे या गावांपासून झाली आहे. या गावांना सध्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, गावात टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांच्याकडे केली. निकम यांनी मंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी केली आहे. टंचाईग्रस्त गावात उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून चालू वर्षाचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार केला जातो. दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, पाणीपुरवठा विभाग अधिकारी, आमदारांच्या उपस्थितीत बैठक घेतली जाते.
त्यामध्ये संभाव्य टंचाई आराखडा तयार केला जातो. यावर्षी जलजीवन मिशनसह अन्य योजनेतून पाणीयोजना आकार घेत आहेत; मात्र काही ठिकाणी कामे पूर्ण, तर काही ठिकाणी अजूनही सुरू आहेत. मात्र नद्या, नाले यांच्यामध्येही पाणी नसल्याने पाणीयोजनांचे भवितव्य अंधारमय आहे. यावर्षी सप्टेंबरमधील काही कालावधी सोडला तर ऑक्टोबरपासून पाऊस पडलेला नाही. याचा परिणाम शेतीवरही झाला. त्याबरोबर गावागावातील नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत वाहणाऱ्या नद्या गेल्या महिन्यांपासूनच कोरड्या पडल्या आहेत. यावर्षी तालुक्यात ३ हजार ६३१ मिमी एकूण पाऊस कोसळल्याची नोंद आहे.
गतवर्षातील टंचाईग्रस्त गावे – अडरे, सावर्डे, कोंडमळा, टेरव, गुढे, अनारी, कादवड, खडपोली, गाने, डेरवण, आकले, पेढांबे, कळकवणे, नारदखेरकी, करंबवणे, परशुराम, शिरवली, तळसर आणि पालवण या १९ गावांतील ३१ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला होता.