सध्या दळणवळणामध्येही स्पर्धा चालू असून, खासगी वाहनांमध्ये अनेक सुविधा उपलब्ध होत आहेत. या स्पर्धेमध्ये एसटी महामंडळही कुठे कमी नाही. एसटीनेही अत्याधुनिक गाड्यांचा ताफा आणला आहे. त्यामध्ये डिजिटल बोर्ड, वायफाय सेवा, आरामदायी आसने दिली होती; मात्र कोट्यवधीचा खर्च करून बसवलेली वायफाय सेवा काही काळातच बंद पडली आहे. डिजिटल बोर्डाच्या जागी आता साधे बोर्ड दिसून येत आहे. त्यामुळे एसटीचा कोट्यवधीचा खर्च वाया गेला आहे.
खासगी बसमध्ये प्रवाशांच्या मनोरंजनासाठी विविध सुविधा दिल्या आहेत. त्या तुलनेत एसटी महामंडळाच्या बसमध्ये प्रवाशासाठी सुविधा कमी आहेत. त्यामुळे महामंडळाने तीन वर्षांपूर्वी बसमध्ये वायफाय सुविधा सुरू केली. त्यामुळे प्रवाशांना बसमध्ये मोफत मनोरंजनासाठी वायफायची सोय उपलब्ध झाली होती; परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून एसटीमधील वायफाय सुविधा बंद पडली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असली तरी यासाठी केलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.
विविध सुविधांचा बोजवारा – लांब पल्ल्याच्या बसमधील स्मार्टफोनधारक स्टोअर केलेले कार्यक्रम पाहून मनोरंजन करून घेत होते. यात बातम्या, चित्रपट, ध्वनीफीत गाणे, दिसणारे गाणे, कथा, कादंबरी किंवा एखाद्या पुस्तकाचे वाचन केले जात होते. त्याचप्रमाणे लहान बालकांसाठी कार्टून, व्हिडिओ आडिओ गेम, गेम, कॉमिक्स बुक्सची सुविधा उपलब्ध होती. महिलांसाठी सीरियलची सुविधा होती; मात्र काही दिवसांत या सुविधेचा बोजवारा उडाला. काही दिवसातच वायफाय नॉट रिचेबल झाले असल्याचे प्रवासीवर्गामधून बोलले जात आहे.