मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात पावसामुळे काँक्रीटला तडे गेल्याने रस्त्याची गंभीर अवस्था झाली आहे. घाटातील काँक्रीट रस्त्याला तडे गेल्याने परिस्थिती गंभीर बनली असून, ठेकेदाराकडून तुटलेल्या भागांवर सिमेंट ओतून थोडीफार दुरुस्ती केली जात आहे. ही तात्पुरती मलमपट्टी प्रवाशांच्या जीवावर बेतू शकते, असे अनेकांचे म्हणणे आहे. परशुराम घाटात काही ठिकाणी माती खचत असल्यामुळे वाहतूक व्यवस्थेवरही ताण निर्माण झाला आहे. रस्त्याच्या दोन्ही लेनवर तडे गेल्याने आता फक्त एका लेनवरून दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू ठेवण्यात येत आहे. यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे.
दरम्यान, माती वाहून जाऊ नये म्हणून घाटात दगडांचा खच टाकून माती रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र या उपाययोजना तात्पुरत्या असून, घाटाची स्थिती अधिक धोकादायक बनत असल्याचं चित्र आहे. मुंबईकडे जाणारी लेन पूर्णपणे बंद करण्यात आली असून, त्यामुळे प्रवाशांनी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. घाटात काही ठिकाणी माती खचत असल्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने घाट अधिकच धोकादायक बनला आहे. पावसात वाहून जाणारी माती रोखण्यासाठी ठिकठिकाणी दगडांचा खंच टाकला जात आहे.