तालुक्यातील एका पुलाच्या भूमिपूजनाच्या पाटीवरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय प्रतिष्ठेच्या वादाला तोंड फुटले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बजेटमधून कुरतडे भाडकरकोंड ते टिके भातडेवाडीदरम्यानचा ५ कोटींचा पूल काजळी नदीवर बांधण्याच्या कामाचे नुकतेच भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले; मात्र स्थानिक पुढाऱ्याने तयार केलेल्या पाटीवर बांधकाममंत्र्यांचे नाव घालण्यात आले होते. बांधकाममंत्र्यांनी राज्यशिष्टाचार विसरणाऱ्यांना फैलावर घेतल्यानंतर तत्काळ ही पाटी बदलण्यात आली. सत्तेत एकत्र असताना आम्हाला स्थानिक पातळीवर काही विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजनाच्या कार्यक्रमात बोलवलेही जात नाही, अशी खंतही भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याचे समजते.
यामुळे शिवसेना-भाजपमध्ये अंतर्गत काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील कुरतडे भाडकरकोंड ते टिके भातडेवाडी दरम्यानचा काजळी नदीवर ५ कोटींचा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बजेटमधून मंजूर झाला. त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या वेळी लावण्यात आलेल्या पाटीवर पालकमंत्र्यांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची नावे प्रामुख्याने घेण्यात आली होती; परंतु भाजपचे सार्वजनिक बांधकामंत्री रवींद्र चव्हाण यांचे नाव वगळण्यात आले होते. त्यांना डावलल्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती.
प्रशासनाकडून भाजपला स्थानिक पातळीवर कसे डावलले जाते, ही गंभीर, गोष्ट मंत्री चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे चव्हाण, चांगलेच संतापले. त्यांनी बांधकामच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. राजकीय पदाधिकारी राजकारण करत असतात. परंतु, अधिकाऱ्यांनी la प्रोटोकॉल विसरू नयेत, अशी तंबीच दिली. त्यानंतर रातोरात भूमिपूजनाची पाटी काढून मंत्री चव्हाण यांचे नाव असलेली पाटी लावण्यात आली. यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असले तरी भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत संबंध ताणले गेल्याचे स्पष्ट होत आहे.