28.6 C
Ratnagiri
Friday, December 27, 2024
HomeChiplunपरशुराम घाटात पावसाळ्यात दरड कोसळल्यास वाहतुकीला अडथळा नाही

परशुराम घाटात पावसाळ्यात दरड कोसळल्यास वाहतुकीला अडथळा नाही

मुंबई – गोवा चौपदरीकरणांतर्गत परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर असून पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होईल. शिवाय पावसाळ्यात सुरक्षिततेच्या दृष्टीने पेढे बाजूकडील दुहेरी मार्गावरून वाहतूक सुरू ठेवली जाईल. तर घाट बाजूकडील दुहेरी मार्गावरील वाहतूक बंद ठेवली जाणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. यामुळे पावसाळ्यात परशुराम घाटात दरड कोसळल्यास वाहतुकीत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, असा अंदाज वर्तवला जात आहे. मुंबई – गोवा चौपदरीकरणांतर्गत महामार्गांच्या खेरशेत ते वालोपेपर्यंत चौपदरीकरणाचे काम सुरू झाले. मात्र, पेढे, परशुराम येथील शेतकरी कुळांना संपादीत जागेचा शंभर टक्के मोबदला मिळावा यासाठी येथील ग्रामस्थांनी तीन ते चार वर्षे लढा दिला. अनेकदा मोर्चे काढून आंदोलने केली. मात्र शेवटी ग्रामस्थांच्या पदरी निराशाच पडली. पेढे परशुरामवासीयांच्या तीव्र विरोधामुळे परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम रखडले होते. महामार्गाच्या पुर्ततेसाठी अखेर उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर डिसेंबर २०२२ मध्ये घाटातील रूंदीकरणाच्या कामास सुरूवात झाली. न्यायालयाच्या आदेशानंतर झपाट्याने सुरू झालेले काम अखंडपणे सुरू आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाटानंतर मोठा आणि अवघड घाट म्हणून परशुराम घाटाची ओळख राहिली आहे. या घाटाची ५.४० कि.मी लांबी आहे. या घाटातील डोंगर कटाई व सपाटीकरणासाठी ठेकेदार कंपनीला मोठा त्रास सहन करावा लागला. डोंगर कटाई दरडीचा धोका वाढवणारी ठरली. यामध्ये जुलै २०२१ रोजी मोठी दरड पेढे गावात कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पेढे ग्राम स्थांच्या पाठपुराव्यानंतर काहींवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. तर पोकलेन मशीनवर अजस्त्र दगड कोसळल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला होता. पेढे बौद्धवाडीत मोठे दगड कोसळून घरांचे नुकसान झाल्याची घटना घडली होती. दरड कोसळून वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता.

एकंदरीत डोंगर कटाई व सपाटीकरणाच्या कामात ठेकेदार कंपनीला मोठा त्रास सहन करावा लागला. या जीवघेण्या दरडीची दखल घेऊन शासनाने वरिष्ठ अधिकारी व तज्ज्ञांचे एक शिष्टमंडळ परशुराम घाटात पाठवले होते. संपूर्ण सर्व्हेक्षण करून व माती परीक्षण केल्यानंतर दरडीचा धोका टाळण्यासाठी व पेढे गावाला पूर्ण संरक्षण मिळावे म्हणून येथे संरक्षक भिंत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला व तातडीने भिंतीचे काम देखील सुरू करण्यात आले. येथील भिंतीला रासायनिक प्रक्रिया केलेली लोखंडी परंतु लवचिक व मजबूत अशा जाळीचे आवरण देखील देण्यात आले आहे. कदाचित दरड खाली आली आणि त्यामुळे तो भिंत फ टली तरी लोखंडी जाळी त्याला थांबवू शकते. परिणामी धोका कमी होईल, अशा पद्धतीने रचना करण्यात आली आहे. तसेच भिंतीच्या आतील बाजूने रासायनिक लेप असलेला मजबूत असा प्लास्टिक पेपर अंथरण्यात आला आहे.

जो दरडीच्या भिंतीत जाऊ देणार नाही, अशा अत्याधुनिक पध्दतीने भिंतीचे काम करण्यात आले आहे. या घाटाची एकूण लांबी ५.४० कि.मी. आहे. या लांबीपैकी सुमारे ४.२० कि.मी. लांबीतील कॉक्रेटिने चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले असून वाहतूक सुरळीतपणे सुरु आहे. यामध्ये १.२० कि.मी. लांबीतील बांधलेल्या आहेत. ६०० मीटर दुहेरी मार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. तर ६०० मीटर दुहेरी मार्गांच्या कॉक्रिटीकरणाचे काम १५ दिवसांत पूर्ण होईल, अशी माहिती सुत्रांनी दिली असून भरावाचे काम थोड़े असून ते देखील येत्या काही दिवसांत पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. या मार्गावर दगड फोडताना अद्ययावत मशिनरीज वापरण्यात आल्या. तरी देखील ठेकेदार कंपनीला त्रास झाला. या मार्गावरील काम प्रगतीपथावर आहे. यामुळे पावसाळ्यात घाटातून सुरळीत वाहतूक होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular