छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्याच्या अनुषंगाने युनेस्कोचे पथक विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिक, स्वयंसेवी संस्था, पक्ष, संघटना, अधिकारी आणि कर्मचारी, ग्रामस्थ, एन.एस.एस, एन.सी. सी, विविध सामाजिक मंडळे, सामाजिक संस्था व शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या दोन्ही किल्ल्याच्या परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे. पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयामार्फत राज्यातील मराठा लष्करी स्थापत्य यांना युनेस्को जागतिक वारसा नामांकन मिळण्यासाठी नामांकन प्रस्ताव सादर केलेला आहे.
जागतिक वारसा म्हणून किल्ले विजयदूर्ग व किल्ले सिंधुदुर्ग यांचे संवर्धन व संगोपण करण्याच्या अनुषंगाने युनेस्कोचे पथक ६ ऑक्टोबर रोजी विजयदुर्ग तर ७ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देणार आहे. दुर्ग वैभव हे महाराष्ट्राच्या अस्मितेचा वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांप्रती नागरिकांचे भावनिक नाते आहे. आपल्या जिल्ह्यातील २ किल्ल्यांची दखल जागतिक पातळीवर घेतली जाणार आहे. त्यामुळे किल्ल्याची देखभाल करणे, त्याचे जतन व संवर्धन करणे व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांची स्वच्छता ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. २ ऑक्टोबर २०२४ हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे.
त्या निमित्ताने स्वच्छता ही सेवा २०२४ मोहीम दि. १७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या वर्षीच्या स्वच्छता हि सेवा २०२४ साठी स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता हि थीम निश्चित केलेली आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिक, स्वयंसेवी संस्था, पक्ष, संघटना, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विजयदुर्ग व सिंधुदुर्ग या दोन्ही किल्ल्याच्या परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे.