कोकणात स्पोर्ट्स टुरिझममध्ये भरीव काम करणाऱ्या सुवर्णसूर्य फाऊंडेशनतर्फे अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन शनिवारी रात्री १२ वाजता गणपतीपुळे मार्गावर करण्यात आले आहे. कोकणात सर्वप्रथम होणाऱ्या अल्ट्रा मॅरेथॉनसाठी गणपतीपुळे, मालगुंड, भंडारपुळे, नेवरे, कोतवडे, आरे वारे, बसणी येथील ग्रामस्थ जोरदार तयारीला लागले आहेत. गणपतीपुळे येथे मॅरेथॉनच्या उद्घाटनासाठी राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, राजापूरचे आमदार किरण तथा भैय्याशेठ सामंत, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. रत्नागिरी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या माध्यमातून होत असलेली ही स्पर्धा आहे. प्रत्येक गावातील ग्रामपंचायत, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती तसेच त्या त्या गावातील देवस्थान समित्या असे सर्वजण आपापला सिंहाचा वाटा या अल्ट्रा मॅरेथॉनच्या यशस्वीतेसाठी देत आहेत. वाडी वस्त्यांमध्ये बैठका घेतल्या जात आहेत. कोकणच्या इतिहासातलं हे एक सोनेरी पान असेल, अशी भावना गणपतीपुळे ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या बैठकीत ग्रामस्थांतर्फे मांडली गेली.
४२ किमी पेक्षा जास्त अंतर धावणे म्हणजे अल्ट्रा मॅरेथॉन होय. धावपटूंचा कस लागणारं हे अंतर जवळपास ५६ किमीचं आहे आणि भारतभरातून सुमारे २४० धावपटू यासाठी गणपतीपुळ्यात येत आहेत. हे खरे क्रीडा पर्यटक आहेत आणि यांच्यासारख्या चोखंदळ पर्यटकांमुळे आर्थिक वृद्धी जास्त प्रमाणात होऊ शकते, अशी भावना गणपतीपुळे, भंडारपुळे नेवरे, आरे- वारे तसेच बसणी येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली. श्री देव गणपतीपुळे मंदिर देवस्थानच्या प्रांगणातून शनिवारी रात्री १२ वाजता अल्ट्रा मॅरेथॉन सुरू होणार आहे. गणपतीपुळे, भंडारपुळे ग्रामस्थ पहिल्या ३-४ किमीमध्ये दुतर्फा उभे राहून स्पर्धा पूर्ण होईपर्यंत सर्व धावपटूंना प्रोत्साहत करणार आहेत. चंडिका ज मंदिर ट्रस्ट गणपतीपुळे, हॉटेल असोसिएशनव गणपतीपुळे आणि गणपतीपुळे ग्राम पंचायतच्या माध्यमातून कलिंगड, केळी, संत्री, खजूर, मीठ इत्यादीची व्यवस्था केली आहे.
ग्रामपंचायत नेवरे आणि नेवरे ग्राम स्थांच्या माध्यमातून देखील सर्व व्यवस्था नेवरे गावात होत आहे. दयासागर पर्यटन संस्था एक हायड्रेशन पॉइंट सांभाळणार आहे. हॉटेल अंबज्ञ टेबल लाईट व्यवस्थेसाठी सहकार्य करणार असून कैरी होम स्टेतर्फे संत्री आणि कलिंगड वाटप होणार आहे. वारे गावात सर्व धावपटूंसाठी सौ. ज्योती जगदीश वारेकर यांच्याकडून कोकम सरबत वाटप केले जाणार आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून फळे ठेवली जाणार आहेत. डिलाईट इंडस्ट्रीच्या राजीव देवळे यांच्या माध्यमांतून महत्वाच्या ठिकाणी लाईट व्यवस्था केली जाणार आहे. आरे आणि बसणी गावात रूट मॅनेजमेंटसाठी सर्व ग्रामस्थ संपूर्ण सहकार्य करणार आहेत. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सायकलिंग क्लब रत्नागिरी सायकलिस्ट क्लब रूट सपोर्ट करणार आहे. दिवसभरात विविध बैठका घेतल्या गेल्या.
यामध्ये प्रामुख्याने डॉ. श्रीराम केळकर (संस्थान श्रीदेव गणपतीपुळे सरपंच), विद्याधर शेंड्ये (सचिव संस्थान श्रीदेव गणपतीपुळे), बाबाराम माने (श्री चंडिका देवी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष), सौ. कल्पना पकये (सरपंच गणपतीपुळे), महेश केदार (सदस्य ग्रामपंचायत गणपतीपुळे), श्री. पाटील (एमटीडीसी), प्रमोद केळकर (हॉटेल असोसिएशन), उमेश भणसारी (हॉटेल असोसिएशन), तारक मयेकर, अमित घनवटकर, संजय रामाणी, विलास देवरूखकर, संदीप कदम, जगदीश वारेकर, देविदास इंगळे (ग्रामसेवक वारे गाव), दीपक फणसे (सरपंच, नेवरे गाव) यांनी पुढाकार घेतला. पर्यटनासाठी काम करणाऱ्या राजू भाटलेकर यांच्याकडून पेन रिलीफ स्प्रे मिळणार आहेत. हॉटेल ऑनेस्ट नक्षत्रतर्फे धावपटूंना फळे, चिक्कीचे वाटप होणार आहे. या उपक्रमाचे फिनोलेक्स इंडस्ट्रीज, प्राचीन कोकण – एक अनोखे म्युझियम, फ़ास्ट अँड अप, सॉर्जेन हे प्रमुख प्रायोजक आहेत. रुचकर कोकण, जोशी फुड्स, योजक फूड आणि बेवरेजेस यांच्या माध्यमातून कोकणी पदार्थ धावपटूंना दिले जाणार आहेत. आरोही फिजिओथेरपी (रत्नागिरी) आणि एस. एम. जोशी कॉलेज ऑफ फिजिओथेरपी सर्व धावपटूंच्या फिजिओथेरपीची व्यवस्था पाहणार आहे. नित्या प्राणिक हिलिंगतर्फे सर्व धावपटूंना बाथ सॉल्ट दिले जाणार आहे.