25.9 C
Ratnagiri
Sunday, September 24, 2023
HomeRatnagiriॲपवर फोटो टाका, ७२ तासांत खड्डेमुक्त व्हा!

ॲपवर फोटो टाका, ७२ तासांत खड्डेमुक्त व्हा!

रस्त्यावरील खड्डयांच्या दुरुस्तीसाठी नागरिकांना बांधकाम विभागाकडे सतत मारावे लागणारे हेलपाटे आता बंद होणार आहेत. राज्य शासनाने त्यासाठी पीसीआरएस (पॉटहोल कम्प्लेन्ट रिड्रेसल सिस्टिम) हे अॅप विकसित केले आहे. या ॲपवर खड्ड्याचा फोटो टाकल्यानंतर ७२ तासांत बांधकाम विभागाकडून दखल घेतली जाईल आणि दुरुस्तीसाठी पावले उचलण्यात येतील. याला रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागाने दुजोरा दिला असून या अॅपवर काम सुरू असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, अंतर्गत रस्ते यांची मोठ्या पावसात वाताहात होते आणि सर्वसामान्य नागरिकांना वर्षभर त्या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतो. याबाबत बांधकाम विभाग, नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीकडे तक्रार करावी लागते. त्याची तत्काळ दखल घेतली गेल्याची उदाहरणे कमीच आहेत. नादुरुस्त रस्त्यांचा सर्वांत जास्त त्रास सर्वसामान्य नागरिकांना होतो.

नागरिकांच्या वाढत्या तक्रारी आणि त्यांना होणाऱ्या त्रासाचा विचार करून शासनाने याबाबत महत्वाचे पाऊल टाकले आहे. नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते मिळावेत, दळणवळण सोपे व्हावे यासाठी पीसीआरएस (पॉटहोल कम्प्लेन्ट रिड्रेसल सिस्टिम) हे अॅप तयार केले आहे. या अॅपवर खड्डयाचा फोटो टाकला की, बांधकाम विभागाकडून ७२ तासांत याची दखल घेऊन ते खड्डे बुजवले जाणार आहेत. नागरिकांसाठी शासनाने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्य शासनाच्या खड्डेमुक्त योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी शासनाने हे अॅप विकसित केले आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर हे ॲप सुरू आहे. लवकरच सर्व नागरिकांना वापरासाठी खुले होणार असल्याचे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular