कृषिपूरक व्यवसायाबरोबच सहकारी बँका, पतसंस्था, शिक्षण संस्थांच्या माध्यमातून विकास साधला गेला पाहिजे. मुंबईत गेलेला तरुण गावी परतला पाहिजे, त्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून स्पर्धात्मक युगात कोकणनेही सिद्ध व्हायला हवे. तेव्हाच कोकणात श्वेतक्रांती होईल. सहकाराच्या माध्यमातून वाशिष्ठी मिल्कने अल्पावधीत केलेली प्रगती प्रशंसनीय आहे, असे प्रतिपादन सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले. वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्ड प्रॉडक्टच्या वतीने कोकणातील भव्य कृषी महोत्सवाचे उद्घाटन केल्यावर वळसे-पाटील म्हणाले, “आपण खूप वर्षांनी कोकणात आलो. येथील बदल पाहिल्यावर कोकणची वाटचाल वेगळ्या दिशेने सुरू असल्याचे जाणवले.
अत्याधुनिक पद्धतीची वाशिष्ठी डेअरी, चिपळूण नागरी पतसंस्थेचे कार्य, सावर्डेत उभारलेली सह्याद्री शिक्षणसंस्था पाहताना कोकण आता वेगळ्या वळणावर आहे. कोकणातून मुंबईत गेलेला तरुण गावी यायला हवा व गावातच शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करायला हवेत. जेथे पाणी मुबलक आहे अशा ठिकाणी कृषिपूरक उद्योगाला वाव आहे. दुग्ध प्रकल्पाच्या यशस्वितेसाठी या क्षेत्रातील स्पर्धा लक्षात घेऊन दुधाळ गायी येथे आणाव्यात. कोकण कृषी विद्यापीठाने त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. आज अल्पावधीत वाशिष्ठी डेअरीने चांगले काम सुरू केले आहे. त्यांनी पुढच्या काळात आपल्या व्यवसायाचा जम बसवावा, तशी यंत्रणा उभी करावी, त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करू.
“स्वतःच्या ताकदीवरच शेती करायला हवी. अर्धवेळ शेती करून फायदा होणार नाही. व्यावसायिक दृष्टिकोन ठेवूनच पूर्णवेळ द्यायला हवा. कोकणचा शेतकरी श्रीमंत नसला तरी तो समाधानी आहे म्हणूनच येथे आत्महत्या होत नाहीत. येथील शेतकऱ्यांमध्ये सहकार्याची भूमिका आहे. त्याचे सहकारात रूपांतर व्हायला हवे.” या वेळी प्रशांत यादव यांच्या वाढदिवसानिमित्त सहकार मंत्र्याच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. ५ हजार लोक दूध घालतात अध्यक्ष प्रशांत यादव म्हणाले, “वाशिष्ठी डेअरीला ५ हजार लोक दूध घालत आहेत. या शेतकऱ्यांना महिन्याकाठी साडेतीन कोटी बिलाचे वाटप केले जाते. कोकण कृषी विद्यापीठाने दुधाळ जनावरांचा शोध लावून त्याची पैदास करावी म्हणजे या व्यवसायाला अधिक बळ मिळेल.”