25.2 C
Ratnagiri
Thursday, October 10, 2024

राजापुरात तीन गावांमध्ये वीज पडून नुकसान

ढगांच्या गडगडाटासह रत्नागिरी, राजापूर तालुक्यात परतीच्या पावसाने...

कोकणातील १५ जागा महायुती जिंकेल – मंत्री उदय सामंत

आगामी विधानसभेसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातल्या किती...

सात औद्योगिक संस्थांना नवी ओळख…

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे...
HomeSindhudurgमालवणात दिवसाढवळ्या महिलेला जिवंत जाळले, संतापाची लाट!

मालवणात दिवसाढवळ्या महिलेला जिवंत जाळले, संतापाची लाट!

जवळपास ७ तास तिने मृत्यूशी निकराची झुंज दिली.

दिवसाढवळ्या एका महिलेला अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्यात आल्याने मालवणसह अवघ्या कोकणात संतापाची प्रचंड लाट उसळली आहे. त्याचे पडसाद गुरुवारी मालवणात उमटले. शेकडो महिला उत्स्फूर्तपणे एकवटल्या आणि मोर्चा काढत पोलीस स्थानकासह तहसिल कार्यालयावर येवून धडकल्या. त्यांच्या संतापाचा पारा प्रचंड चढला होता. हे नीच कृत्य करणाऱ्या हैवानाला फासावर लटकवा… नाहीतर आमच्या ताब्यात द्या… आम्ही त्याला जाळून टाकू… महिलेला जिवंत जाळताना काय यातना झाल्या असतील याचे चटके त्याला देखील बसले पाहिजेत असा आक्रमक पवित्रा या महिलांनी घेतला होता. या घटनेने नागरिक विलक्षण संतापले असून त्यांना शांत करताना पोलीसांच्या नाकी नऊ आले. दरम्यान सौभाग्यश्वरी ‘सुशांत गोवेकर (पुर्वाश्रमीची प्रिती केळूसकर) असे जीवंत जाळण्यात आलेल्या महिलेचे नाव असून तिला तिच्या पहिल्या पतीनेच जाळले आहे. सुशांत गोवेकर याचा आणि सौभाग्यश्वरी यांचा घटस्फोट झाला आहे. आरोपी सुशांत गोवेकर हा तिचा पहिला पती असून त्याने तिला नेमके का मारले याचे कारण अजूनही पोलीसांना समजलेले नाही. उलटसुलट चर्चा सुरु आहेत.

पेट्रोल ओतून पेटविले ! – डोक्यात हैवान संचारल्यासारखा आरोपी सुशांत गोवेकर हा बुधवारी २५ सप्टेंबरला दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास मालवणातील एसटी स्टॅन्ड समोर असलेल्या के.जी. डायग्नोस्टीक सेंटर येथे आला. त्याची पहिली पत्नी म्हणजेच सौभाग्यश्वरी येथे परिचारिका म्हणून नोकरी करत असे. तिथे येताच सुशांतने लॅबमधून तिला बाहेर खेचले. दिवसाढवळ्या सर्वांसमोर अंगावर पेट्रोल ओतले. त्यानंतर थंड डोक्याने विडी किंवा सिगारेट शिलगवण्यासाठी लागणारा लायटर पेटवत त्याने तिच्या शरीराला आग लावली. दिवसाढवळ्या हा प्रकार घडत असल्याने आसपासचे लोक धावत आले आणि त्यांनी प्रिती केळूसकरची आरोपी सुशांत गोवेकर याच्या तावडीतून सुटका केली.

अक्षरशः होरपळली – अंगावर पेट्रोल ओतून लायटरच्या सहाय्याने आग लावल्याने ही महिला वेदनानी प्रचंड किंचाळत होती. होळीचा होम पेटावा असे तिचे शरीर आगीनी लपेटले होते. लायटरने सौभाग्यश्वरीला पेटवल्यानंतर आजूबाजूचे लोक म दतीला धावून येताच सुशांत गोवेकरने तेथून पळ काढला. लोकांनी पेटलेल्या सौभाग्यश्वरीला धावपळ करत रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. गंभीररित्या होरपळल्याने तिची प्रकृती अधिकच चिंताजनक बनली होती. डॉक्टरांनी उपचारांची शर्थ केली. तिची अवस्था अनेकांना बघवत नव्हती. ओरोस येथील रुग्णालयात डॉक्टरांनी तिला वाचविण्याचे सर्व ते प्रयत्न केले.

७ तास मृत्यूशी झुंज – आगीच्या ज्वाळांनी होरपळलेल्या सौभाग्यश्वरीला वाचविण्याचे सर्व प्रयत्न करण्यात आले. प्रचंड वेदना होत असताना तसेच अंगाची लाहीलाही होत असतानाही जवळपास ७ तास तिने मृत्यूशी निकराची झुंज दिली. अखेर जीवन-मरणाच्या या लढाईत प्रिती केळूसकर हरली आणि तिने बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास या जगाचा निरोप घेतला. तिचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. प्रितीचा भाऊ परेश अभय केळूसकर याने या संदर्भातील रितसर फिर्याद नोंदविताच पोलीसांनी तातडीने आरोपी सुशांत गोवेकरचा शोध सुरु केला.

गुन्हा दाखल – परेश अभय केळूसकर यांनी नोंदविलेल्या फिर्यादी आधारे सौभाग्यश्वरी गोवेकरचा पहिला पती सुशांत गोवेकर याच्या विरोधात मालवण पोलीसांनी भारतीय न्यायसंहिता १०३ (वाढिव), १०९, १२४,११७ (उ),११८ (२) अन्वये गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरु केला. रात्रभर त्याचा शोध सुरु होता. मात्र तो सापडत नव्हता.

पळून जाण्याच्या तयारीत – रात्रभर त्याचा शोध सुरु होता. आरोपी सुशांत गोवेकर हा पळून जाण्याच्या तयारीत होता, अशी खबर पोलीसांना लागली आणि मालवणचे पोलीस निरिक्षक प्रविण कोल्हे यांच्यासह स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागाचे पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीसांची ३ पथके त्याला पकडण्यासाठी सज्ज करण्यात आली. मालवण, कुडाळ आणि कणकवलीत शोध सुरु होता. कुंभारमाठ परिसरात तो आल्याची टीप मिळताच पोलीस निरिक्षक प्रविण कोल्हे आणि त्यांचे सहकारी तेथे पोहोचले. त्याच्याभोवती सापळा रचण्यात आला आणि त्याला पकडण्यात यश ‘आले. पोलीसांच्या या पथकामध्ये स्वतः पोलीस निरिक्षक प्रविण कोल्हे यांच्यासह पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील, पोलीस उपनिरिक्षक समिर भोसले, सहायक पोलीस उपनिरिक्षक गुरुनाथ कोयंडे, पोलीस हवालदार आशिष गंगावणे, हवालदार प्रमोद काळसेकर आदींचा समावेश होता. त्यांनी ही कामगीरी फत्ते केली.

मालवण हादरले – दरम्यान याबाबतचे वृत्त गुरुवारी प्रसिद्ध होताच मालवणसह अवघे कोकण हादरून गेले. सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. मालवणात तर शोककळा पसरली आहे. शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह तिचा भाऊ परेश केळूसकर याच्या ताब्यात, पोलीसांनी दिला. धुरीवाडा येथे तिच्या माहेरच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत, तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेकांना अश्रु अनावर झाले. अधिक तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular