गेल्या महिन्यात झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकताना नीरजच्या पाठीला दुखापत झाली होती. त्यामुळे दुखापतीमुळे त्याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधून माघार घेतली होती; पण आता तो फिट झाला आहे. अलीकडेच, नीरजने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिले होते. अंजू बॉबी जॉर्जनंतर हे पदक जिंकणारा तो दुसरा खेळाडू ठरला. अंतिम फेरीत नीरजने ८८.१३ मीटर अंतरापर्यंत भालाफेक करून रौप्यपदक जिंकले.
हरियाणातील पानिपतजवळील खंडारा गावात राहणारा नीरज चोप्रा डायमंड लीगचा मुकुट जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे. चोप्राच्या आधी डिस्कस थ्रोअर विकास गौडा हा डायमंड लीगमध्ये पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवणारा एकमेव भारतीय होता. गौडा यांनी २०१२ न्यूयॉर्क आणि २०१४ दोहामध्ये दोनदा दुसरे स्थान पटकावले होते, याशिवाय २०१५ मध्ये शांघाय आणि यूजीनमध्ये पार पडलेल्या स्पर्धेत दोनदा तिसरे स्थान पटकावले होते.
ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्राने शुक्रवारी आणखी एक ऐतिहासिक कामगिरी करत लुसाने डायमंड लीग २०२२ वर नाव कोरले आहे. ही स्पर्धा जिंकणारा नीरज पहिला भारतीय ठरला आहे. नीरजने ८९.०८ मीटरच्या पहिल्या थ्रोने लुसाने डायमंड लीगवर विजय मिळवला. नीरज चोप्राने यंदाच्या हंगामात ९० मीटर मार्क पार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याने याच वर्षी स्टोकहोम डायमंड लीग २०२२ मध्ये आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडला. त्याने ८९.९४ मीटर भाला फेकला होता. त्यामुळे या हंगामात तो ९० मीटर मार्क पार करणार अशी आशा होती.

