राज्याची ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी राज्यशासन आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार आहे. त्याचबरोबर राज्यभर सुमारे ७०० ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्याबरोबरच बाल आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. सध्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेचे जाळे मजबूत करण्यावर भर दिला जात आहे.
दसरा मेळाव्यापूर्वीच शिंदे यांनी ही घोषणा केल्याने त्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमामध्ये या योजने संबंधी घोषणा केली आहे. या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, ज्येष्ठ पत्रकार प्रणव रॉय आदी संबंधित उपस्थित होते. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अद्ययावत आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. या निमित्ताने राज्यात सुमारे ७०० ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
मुंबईत २२७ ठिकाणी अशा प्रकारचे दवाखाने सुरू करण्यात येणार असून, त्यापैकी ५० दवाखाने २ ऑक्टोबरपासून सुरू झाले आहेत. आपला दवाखान्याच्या माध्यमातून नागरिकांना घराजवळ अद्ययावत आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्पष्ट केले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांच्या बळकटीकरणासाठी आरोग्य संस्थांचे श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे, जेणेकरून ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांना स्थानिक पातळीवरच मिळू शकेल. राज्यात कॅथलॅब देखील सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या भागातील आरोग्य संस्थांचे काम ८० ते ९० टक्के पूर्ण झाले आहे तेथे निधी उपलब्ध करून ते काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी आणि नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे, असंही त्यांनी सांगितलं.

