शासनामार्फत बचत गटातील महिलांना उमेद अंतर्गत विविध बँकाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य केले जाते. परंतू काही बचत महिला परस्पर काही एजंटद्वारे राष्ट्रीयकृत बँकाकडून कर्ज घेण्यासाठी रक्कम मोजत आहेत. यातून तालुक्यातील दिडशेहून अधिक महिलांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार पुढे येत आहे. विशेषतः ग्रामिण भागातील मागासवर्गिय वस्त्यांमध्ये बोगस कर्ज वाटपाचा अक्षरशः धुमाकूळ सुरू आहे. त्वरित कर्ज मिळण्यासाठी काही महिलांनी प्रत्येकी ५ हजारहून अधिक रक्कम मोजली आहे. परंतू दिलेल्या मुदतीत अद्याप कर्ज न मिळाल्याने संबंधीत महिलांवर डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे.
महिलांच्या हाताला काम मिळावे, महिलांनी रोजगाराची कास धरून त्या सक्षम व्हाव्यात, यासाठी शासनाच्या उमेद अभियान अंतर्गत बचत गटांच्या महिलांसाठी विविध उपक्रम आणि योजना राबवल्या जातात. तालुक्यात शेकडो बचत गटांच्या स्थापना झाल्या असून अनेक गटांनी विविध व्यवसायदेखील सुरू केले आहेत. सुमारे १४० हून व्यवसायासाठी कर्ज पुरवठा केला जातो. किमान ६ महिने बचत करणाऱ्या बचत गटांना एक ते दोन लाखाचे कर्ज दिले जाते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ३ ते ७ लाख रूपये कर्ज दिले जाते. त्यासाठी बचत गटांमध्ये सातत्याने प्रशिक्षण, मेळावे घेत जनजागृती केली जाते. तरिसुद्धा काही बचत गटाच्या महिला कर्ज स्वरूपातील अमिषाला बळी पडत आहेत.
संबंधीत एजंट हे राष्ट्रीयकृत बँकाचे नाव घेऊन कर्ज मिळवून देणार असल्याचे सांगतात. त्यासाठी कर्ज घेणाऱ्या व्यक्तींकडून ५ हजार, ३ हजार, १ हजार रूपये अशी रक्कम स्विकारत आहेत. काहींना डिसेंबरअखेर तर काहींना जानेवारीअखेरपर्यंत कर्ज मिळवून देतो असे सांगण्यात आले होते. मात्र अद्याप या महिलांना कर्ज मिळालेले नाही. त्यामुळे याविषयाची ओरड सुरू झाली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील दसपटी, पुर्व विभाग व खाडी विभागातील काही गावांमध्ये दिडशेहून अधिक महिला या जाळ्यात अडकल्या आहेत. तालुक्यातील खडपोली दशक्रोशीतील एक महिला व पुरूष राष्ट्रीयकृत बँकेचे त्वरित कर्ज देण्याचे अमिष दाखवून गंडा घालू लागले आहेत, अशी चर्चा सुरू आहे.
त्यांच्या जोडीला काही तरूण व सावकार पाठीशी असल्याची चर्चा आहे. बुधवार १४ रोजी कर्जापोटी आगाऊ पैसे दिलेल्या महिलांनी शहरातील एका राष्ट्रीयकृत बँकेवर धडक दिली होती. संबंधित बँकेच्या व्यवस्थापकांना आम्हाला कर्ज पुरवठा कधी करणार, अशी विचारणा केली. त्यावर त्या व्यवस्थापकांनी कर्ज वितरीत करण्यासाठी आमचे कर्मचारी ग्रामीण भागात फिरत नसल्याचे सांगितले. १ आता नेमकी कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न संबंधित महिलांना पडला आहे. या प्रकाराबाबत पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे यांच्याकडे सपंर्क साधला असता फसवणूक झालेल्या महिलांची तक्रार अद्यार दाखल झाली नसल्याचे स्पष्ट केले.