मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील तीव्र उतार आणि चढावातील ते ठिकाण अतिशय धोकादायक बनले आहे. बुधवारी (ता. १७) तिथे पुन्हा भीषण अपघात झाला. एका तरुणाचा बळी गेला असून, आठ वाहनांचा चुराडा झाला. दैव बलवत्तर म्हणून काही जण वाचले आहेत. ‘डेंजरस्पॉट’ रक्तरंजित झाल्यामुळे हातखंबावासीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अपघातानंतर प्रशासन किंवा यंत्रणेला उपरती सुचणे हे दुर्दैवच; परंतु महामार्गावरील रखडलेले पुलाचे काम, गोव्याच्या दिशेने जाताना तीव्र उतारामुळे अवजड वाहनांवर नियंत्रण न राहणे आणि मुंबईच्या दिशेने जाताना असलेल्या चढावात अवजड वाहने रखडणे, अशा गंभीर समस्यांमुळे हा स्पॉट धोकादायक झाला आहे. यापूर्वीच्या रुंदीकरण झाले. अपघातानंतर आता या अपघातामुळे काय सुधारणा होणार, याकडे हातखंबावासीयांचे लक्ष लागले आहे. रत्नागिरी- मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरीनजीक असलेल्या हातखंबा येथील तीव्र उतार आणि चढावाचा भाग पुन्हा एकदा अपघातस्थळ बनला आहे. बुधवारी या घोकादायक वळणावर झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर सुमारे आठ वाहनांचे मोठे नुकसान झाले.
या घटनेमुळे हातखंबावासीयांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले असून, प्रशासनाच्या दुर्लक्षावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असतानाही हातखंबा येथील विशिष्ट भौगोलिक रचनेमुळे हा भाग वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. गोव्याच्या दिशेने येताना तीव्र उतार असल्यामुळे अवजड वाहनांवर नियंत्रण मिळवणे कठीण होते, तर मुंबईकडून जाताना असलेला तीव्र चढ चढताना हीच वाहने अडखळतात. कालच्या अपघाताचे नेमके कारण हेच असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक ग्रामस्थांनी अनेक वर्षांपासून या धोकादायक स्थितीबद्दल प्रशासनाला वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. यापूर्वीही याच ठिकाणी चालकाचे नियंत्रण सुटल्याने काही शिक्षकांच्या दुचाकी चिरडून जवळच्या दोन टपऱ्या ट्रकने उद्ध्वस्त केल्या होत्या. त्यानंतर तेथील अरुंद रस्त्याच्या बाजूची झाडे तोडून हा रस्ता रुंद करण्यात आला; परंतु देसाई हायस्कूल ते दर्गा या दरम्यान होणाऱ्या पुलाचे काम अनेक वर्षे रखडले आहे. पुलाचे काम लवकरात लवकर झाल्यानंतर हे सर्व प्रश्न सुटणार आहेत; परंतु ते काम कधी होणार, असा प्रश्न स्थानिकांसमोर निर्माण झाला आहे.
स्थानिकांनी सुचविलेले उपाय – येथे वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक, ग्रामस्थ त्रस्त आहेत. त्यांनी प्रशासनाला काही उपाय सुचविले आहेत. त्यापैकी एक म्हणजे वरती बॅरिकेडस् लावून एक पोलिस कर्मचारी ठेवावा आणि वाहनधारकांना सूचना देत वाहने सोडावीत किंवा छोटे गतिरोधक टाकावेत. तसेच चढाव कमी करण्यासाठी भराव टाकून घ्यावा. तसे झाले तर अवजड वाहने अडखळणार नाहीत.

