सिंधुदुर्ग सागरी हद्दीत मासेमारीकरीता गेलेल्या रत्नागिरीतील ४ नौकांचा भर समुद्रात पाठलाग करुन नौकेवरील खलाशांना मारहाण करण्यात आल्याचा दावा रत्नागिरीतील मच्छिमारांनी केला आहे. यावरच न थांबता नौकेला बांधलेली डिंगी गस्ती नौकेने उडवून दिली. त्यात असलेले दोन खलाशी त्यामुळे समुद्रात फेकले गेले. बुधवारी रात्रौ १० वाजण्याच्या सुमारास हा सारा प्रकार वेंगुर्ला येथे झाल्याचे मच्छिमारांनी सांगितले. याबाबत रात्री मच्छिमारांनी रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात धाव घेवून तक्रार नोंदविली आहे. या साऱ्या प्रकाराविरूद्ध रत्नागिरीतील मच्छिमार एकवटले असून त्यांनी याबाबत गुरूवारी रत्नागिरीत सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयावर धडक दिली. कोकणात मासेमारीवरून रणकंदन माजले आहे. तुम्ही आमच्या हद्दीत यायचे नाही, आल्यास तुमच्या नौका फोडून टाकू, अशा धमक्या रत्नागिरीतील मच्छीमारांना वारंवार मिळतं आहेत. एकीकडे मच्छीमारांना रिपोर्ट मिळत नसल्याने तेथील मच्छीमार आधीच मेटाकुटीस आले आहेत. आता तर मत्स्यविभागाचे नवे संकट त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे असे तक्रारदार मच्छिमारांचे म्हणणे आहे.
चार बोटी गेल्या होत्या – याबाबत अधिक वृत्त असे की, रत्नागिरीतील ४ बोटी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला सागरी हद्दीत मासेमारीकरीता गेल्या होत्या. रात्रीच्यावेळी अचानक वेंगुर्ला येथील स्थानिक मच्छीमार, मत्स्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी गस्ती नौका घेवून मासेमारी करणाऱ्या रत्नागिरीतील बोटींच्या दिशेने निघाले.
खलाशी घाबरले – अचानक वेंगुर्ल्यातील गस्ती नौकेवरील अधिकारी, कर्मचारी आणि मच्छीमार आरडाओरड करत मासेमारी करणाऱ्या रत्नागिरीतील नौकांच्या दिशेने येत असल्याचे पाहून रत्नागिरीतील नौकेवरील खलाशी घाबरलें आणि अचानक त्यांनी आपली नौका ‘समुद्रातून पुढे नेण्याचा प्रयत्न केला.
डिंगी ठोकली – याचवेळी एका नौकेला डिंगी बांधली होती. त्या डिंगीत दोन खलाशी बसले होते. नौका न थांबल्याने गस्तीनौकेने पाठलाग सुरुच ठेवला आणि मासेमारी नौकेला बांधलेल्या डिंगीला जोरदार धडक दिली. यावेळी डिंगीमध्ये बसलेले दोन खलाशी समुद्रात फेकले गेले असा दावा गुरूवारी काही मच्छिमारांनी या सगळ्या प्रकाराची पत्रकारांना माहिती देताना केला.
वाचविण्यात यश – डिंगीतून समुद्राच्या पाण्यात फेकले गेलेले दोन खलाशी गटांगळ्या खात होते. त्याचवेळी गस्तीनौका त्यांच्या अंगावरुन नेल्याचा आरोप रत्नागिरीतील मच्छीमारांनी केला आहे. आपला जीव वाचविण्यासाठी धडपड करणाऱ्या त्या दोन खलाशांना नौकेवरील सहखलाशांनी वाचविले.
दोघांना दुखापत – या घटनेत समुद्रात फेकले गेलेल्या दोन खलाशांना गंभीर दुखापती झाल्या.. त्यांना तत्काळ दवाखान्यात घेवून जा, अशी विनंती रत्नागिरीतील नौकेवरील खलाशांनी केली मात्र त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून दोन्ही खलाशांना तसेच तडफडत ठेवले असा देखील संबंधित मच्छिमारांचा आरोप आहे.
खलाशांना मारहाण – सिंधुदुर्गातील गस्ती नौकेने स्थानिक मच्छीमारांना घेवून रत्नागिरीतील मासेमारी नौकेवरील खलाशांना बेदम मारहाण केल्याचा आरोप रत्नागिरीतील मच्छिमारांनी केला आहे. आमचा गुन्हा काय? असे नौकेवरील पागीने विचारले. आमची बोट रनिंगमध्ये आहे. असे असताना तुम्ही पाठलाग करुन अशा पद्धतीने नुकसान का केले? असा सवाल, करताच त्या पागीलादेखील मारहाण करण्यात आली असे त्यांचे म्हणणे आहे.
नौकेतील मासे पळवले – एकूण ४ नौका वेंगुर्ला समुद्रात पकडण्यात आल्या. या चारही नौका समुद्रात रनिंगमध्ये होत्या. अशावेळी जाणून बुजून चुकीची कारवाई करुन चार नौका बंदरावर आणल्या. तत्पूर्वी नौकेतील असलेले मासे तेथील मच्छीमारांनी पळवून नेल्याचा आरोप ही करण्यात आला आहे.
रत्नागिरी पोलिस स्थानकात गर्दी – रत्नागिरीतील नौका वेंगुर्ल्यात पकडल्या, अशी माहिती रत्नागिरीत येवून धडकली. त्यानंतर बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीतील मच्छीमार पोलिस स्थानकात दाखल झाले. पोलिस स्थानकात मच्छिमारांची मोठी गर्दी झाली होती. आमच्या खलाशांना अमानुष मारहाण झाली असल्याची तक्रार नोंदविण्याची विनंती ‘ त्यांनी केली. पोलिसांनी तक्रार अर्ज घेवून मच्छीमारांना माघारी पाठविल्याचे या मच्छिमारांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मत्स्य आयुक्त कार्यालयावर धडक – बुधवारी रात्रीच्या या घडामोडीनंतर स्थानिक मच्छीमार गुरुवारी रत्नागिरीच्या सहाय्यक मत्स्य आयुक्त यांच्या कार्यालयात दाखल झाले आणि घडलेल्या प्रकाराबाबत त्यांना जाब विचारला. आम्हाला देखील पोट आहे, आमच्या हद्दीतदेखील इतर जिल्ह्यातील नौका येतात, पण आम्ही सर्वांना सामावून घेतो आमच्या नौका त्यांच्या जिल्ह्यात गेल्या की कारवाई होते, हा कुठला प्रकार? असा सवाल स्थानिक मच्छीमारांनी केला.
मारहाणीचा अधिकार दिला कुणी? – यावेळी खलाशांना अमानुषरित्या मारहाण झाली, याबाबत सर्वच मच्छीम ारांनी नाराजी व्यक्त केली. मारहाण करण्याचा अधिकार दिला कुणी? असे प्रश्न उपस्थित्त करुन अशा कृत्यामुळे खलाशीच बोटीवर राहणार नाहीत, अशी भिती स्थानिक मच्छीमारांनी व्यक्त केली. याबाबत आपण चौकशी करुन सबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना देवू, असे आश्वासन सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांनी मच्छीमारांना दिले.

