रत्नागिरी पालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक आणि चिंताजनक असताना पालिकेच्या मालकीच्या नाट्यगृहाच्या देखभालीचा खर्च म्हणजे चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला, या म्हणीप्रमाणे झाली आहे. सहा महिन्यांत वेगवेगळे प्रयोग आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून पालिकेच्या मालमत्ता विभागात १४ लाख ९५ हजारांचे उत्पन्न मिळाले; परंतु या नाट्यगृहाच्या देखभालीचा महिन्याचा खर्च सरासरी ५ लाख असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये देखभालीसाठी ३१ लाख ७६ हजारएवढा खर्च झाला आहे. उत्पन्नाच्या दुप्पट नाट्यगृहाच्या देखभालीवर खर्च होत आहे. ही परिस्थिती पालिकेला आणखी आर्थिक खाईत लोटणारी आहे. त्यामुळे नव्या सत्ताधाऱ्यांनी यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे.
कोकणातील सर्वांत मोठे नाट्यगृह म्हणून रत्नागिरी पालिकेच्या मालकीचे वि. दा. सावरकर नाट्यगृह हे आहे. काही वर्षांपूर्वी नाट्यगृहाच्या छताच्या गळतीमुळे ते चर्चेत होते. त्यानंतर वातानुकूलित यंत्रणा बिघडल्याने उन्हाळ्यातील अनेक प्रयोग रद्द झाले.उत्पन्नावर त्याचा मोठा परिणाम झाला. त्यामुळे नाट्यकर्मी एकत्र येऊन नाट्यचळवळ कायम सुरू राहावी, यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांना भेटून साकडे घातले होते. सामंत यांनी या नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी सुमारे पाच ते सात कोटी खर्च केले आहेत. सर्व यंत्रणा अत्याधुनिक बसवण्यात आली आहे. असे असताना गेल्या देखभालीवर एवढा खर्च कसा होतो, असा प्रश्न नव्या सत्ताधाऱ्यांना पडला आहे. रत्नागिरी पालिकेच्या मालमत्ता विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सहा महिन्यांत विविध नाटकांचे प्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सभांच्या माध्यमातून नाट्यगृहाला १४ लाख ९५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.
याच काळात नाट्यगृहाच्या देखभालीचा मासिक खर्च सरासरी ५ लाख रुपयांच्या घरात झाला. ३१ लाख ७६ हजार रुपयांचा खर्च उत्पन्नाच्या तुलनेत कमालीचा जास्त आहे. दुरुस्ती, वीज बिल, १५ कर्मचारी आणि दैनंदिन स्वच्छतेवर हा खर्च होत असल्याने पालिकेची तिजोरी रिकामी होत आहे. नाट्यगृह हे शहराच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असले तरी त्याचा आर्थिक भार पेलणे आता पालिकेला कठीण जात आहे.
उत्पन्न वाढवण्यासाठी ठोस प्रयत्न हवेत – नाट्यगृहाचे भाडे आणि त्यातून मिळणारे उत्पन्न वाढवण्यासाठी ठोस प्रयत्न होत नसल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. एकीकडे खासगी सभागृहे नफ्यात चालत असताना पालिकेच्या नाट्यगृहाचा तोटा दिवसेंदिवस का वाढत आहे, असा सवाल आता नागरिक आणि करदात्यांमधून उपस्थित केला जात आहे. जर खर्चावर नियंत्रण मिळवले नाही किंवा उत्पन्नाचे स्रोत वाढवले नाहीत, तर आगामी काळात नाट्यगृहाचा पडदा ओढण्याची वेळ येईल की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.

