अमेरिकेशी केलेला व्यापार करार हा भारताला विकणारा करार आहे, भारत मातेला विकताना तुम्हाला लाज वाटली नाही का असा संतप्त सवाल करत मोदी सरकारला लोकसभेत धारेवर धरणाऱ्या राहुल गांधीची खासदारकी रद्द करत त्यांना निवडणूक लढविण्यासाठी आजीवन बंदी घालावी अशी मागणी भाजपाने केली असून तशा आशयाचा प्रस्ताव लोकसभेत भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी मांडला आहे. २० वर्षापुवी याच प्रस्तावामुळे लोकसभेतील १० आणि राज्य सभेतील एका सदस्याची खासदारकी रद्द झाली होती. तोच प्रस्तावं आता भाजपने राहुल गांधी विरोधात मांडल्याने राजकारण तापले आहे. अमेरिकेशी केलेल्या व्यापार करारावरून राहुल गांधींनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आक्रमक भुमिका घेत ‘तुम्ही देश विकला आहात, भारत मातेला विकताना लाज वाटत नाही का?’ असे विचारत अमेरिकेसोबत केलेल्या व्यापार करार हा भारतीय शेतकऱ्यांना आणि एकूणच भारताला देशोधडीला लावणारा असल्याचे दाखले देत आरोप केले होते.
अपात्रता ठराव – खासदार राहुल गांधींनी केलेल्या आरोपानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आणि संसदेत त्यांच्या विरोधात अपात्रता ठराव मांडला आहे. त्यामुळे राजकारण तापले आहे. राहुल गांधींनी केलेल्या आरोपांना गुरूवारी भाजपाच्या सदस्यांनी त्यांच्या भाषणातून उत्तर दिले.
आरोप फेटाळले – राहुल गांधींनी ट्रेडडीलंवरून सरकारवर केलेले आरोप भाजपच्या खासदारांनी फेटाळून लावले. त्यानंतर शुक्रवारी संसदेत राहुल गांधींच्या विरोधात अपात्रता ठराव मांडला.
निवडणूक लढविण्यास बंदी – भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात हा अपात्रता ठराव मांडला आहे. या ठरावात राहुल गांधी यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करून त्यांना आजीवन निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात यावी, अशी मागणी खासदार दुबे यांनी केली. दुबे यांच्या मागणीने विरोधकांच्या गोटात खळबळ उडाली आहे.
खासदारांचा विशेष अधिकार – अशा प्रकारचा अपात्रता ठराव मांडणे हा खासदारांच्या विशेष अधिकाराचा एक भाग असून तो मंजूर झाल्यास राहुल गांधींना आजीवन निवडणूक लढण्यास बंदी येऊ शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
गंभीर आरोप – दुबे यांनी राहुल गांधींवर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधी हे सोरोस फाऊंडेशन, फोर्ड फाऊंडेशन आणि यूएसएड अशा संस्थांच्या संपर्कात आहेत. या संस्था भारतविरोधात घटकांसोबत काम करतात. थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम, अमेरिकेला जातात, याबाबतची माहिती प्रस्तावाम ध्ये देण्यात आली आहे.
काय म्हणाले खासदार दुबे ? – भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी यांबाबत पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ‘मी आज लोकसभेत राहुल गांधी यांच्या विरोधात अपात्रता ठराव मांडला. राहुल गांधी हे देशाची दिशाभूल करत आहेत. मी ठराव मांडलाय, त्यावर चर्चा व्हावी. राहुल गांधी यांचं लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांना आजीवन निवडणूक लढण्यास आजीवन बंदीची मागणी केली आहे’.

