गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात विनापरवाना जंगलतोड सुरू असून, अनेक ठिकाणी जंगली वृक्षांच्या लाकडाचे मोठे साठे आडमार्गावर करून ठेवले असल्याचे निदर्शनास येत आहे. याकडे वनविभागाने गांभीर्याने लक्ष देऊन बेसुमार जंगलतोंडीला आळा घालून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे. नायरीच्या खोऱ्यापासून अगदी आंबाघाटापर्यंत सर्वत्र खुलेआम आणि बेसुमार जंगलतोड सुरू आहे. ही जंगलतोड करून दररोज असंख्य ट्रक भरून जळाऊ लाकूड पश्चिम महाराष्ट्रात जात असल्याचे पाहायला मिळते. पूर्वी जळाऊ लाकूड ट्रकमध्ये भरून उघडपणे नेलं जायचं. जळाऊ लाकूड भरून जाणाऱ्या ट्रकची संख्या पाहून नागरिक आणि पर्यावरणप्रेमी अचंबित व्हायचे. आता जळाऊ लाकडाची होणारी वाहतूक उघडपणे दिसू नये म्हणून प्रत्येक ट्रकमधील लाकूड ताडपत्रीने झाकले जाते.
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी आडमार्गाला जळाऊ लाकडाचे ढीगच्या ढीग पाहायला मिळतात. यावरूनच संगमेश्वर तालुक्यात बेसुमार जंगलतोड सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. एकट्या बुरंबी पिंपळ थांबा ते कोंसुब रेवाळेवाडी या मार्गावर रस्त्यावरच जळाऊ लाकडाचा प्रचंड साठा करून ठेवला असल्याचे दिसून आले. गावातील रस्ते जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येतात; मग या रस्त्यावर असणारा साठा हा बेकायदेशीरच ठरतो. मग, वनविभाग अशा बेकायदा आणि बेसुमार वृक्षतोडीवर कारवाई का करत नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गावागावांतून सकाळपासून लाकूड कापण्याच्या छोट्या मशीनचे आवाज ऐकू येतात. या आवाजातून बेसुमार वृक्षतोड होत असल्याचेच सिद्ध होते. यामुळे पक्षी आणि प्राणीजीवन धोक्यात आले असून, त्यांचा आढळ कमी झाला आहे.

