रत्नागिरी: कोकणात सध्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा आपले रौद्ररूप दाखवत आहे. अशातच ५ जुलै रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरात एक अंगावर काटा आणणारी घटना घडली. वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे, रेल्वे स्थानकाचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आलेल्या छताचा एक मोठा भाग अचानक पत्त्यासारखा कोसळला. अवघ्या काही सेकंदांत घडलेल्या या प्रकारामुळे स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली आणि तात्पुरते भीतीचे वातावरण निर्माण झाले.
कोट्यवधींच्या कामाला पहिल्याच मोठ्या पावसाचा तडाखा विशेष म्हणजे, कोकण रेल्वेच्या मुख्य आणि महत्त्वाच्या स्थानकांपैकी एक असलेल्या रत्नागिरी स्थानकाचे नुकतेच कोट्यवधी रुपये खर्च करून अतिशय देखणे नूतनीकरण करण्यात आले होते. मात्र, रविवारी रात्री आलेल्या जोरदार वादळी पावसाचा तडाखा या नव्या छताला सहन झाला नाही. छत कोसळल्यानंतर रेल्वे स्थानकाचा, विशेषतः रिक्षा स्टँडचा संपूर्ण परिसर अचानक अंधारात बुडाला, ज्यामुळे नागरिकांमधील भीती आणखी वाढली.
प्रवाशांचे प्रसंगावधान आणि थरारक बचाव रात्रीच्या वेळी अचानक पाऊस वाढल्याने रेल्वेने प्रवास करणारे अनेक प्रवासी आणि स्थानिक नागरिक पाऊस आणि वाऱ्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी रिक्षा स्टँड परिसरातील याच छताखाली आडोशाला उभे होते. अचानक छताचा भाग निखळत असल्याचा आणि काहीतरी तुटत असल्याचा मोठा आवाज झाला. तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांच्या ही गोष्ट तातडीने लक्षात आली. अत्यंत सावधगिरी आणि प्रसंगावधान बाळगत सर्वांनी एकाच वेळी तिथून बाजूला पळ काढला. अवघ्या काही सेकंदांचा हा खेळ होता, पण नागरिकांच्या या सतर्कतेमुळे एक मोठा आणि भीषण अपघात सुदैवाने टळला. या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही की कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दिवसा ही घटना घडली असती तर? ही घटना रात्री उशिरा घडल्यामुळे स्थानकावर नेहमीच्या तुलनेत प्रवाशांची आणि वाहनांची वर्दळ खूपच कमी होती. मात्र, हेच कोट्यवधींचे छत जर भरदिवसा किंवा एखाद्या प्रमुख रेल्वे गाडीच्या येण्या-जाण्याच्या वेळी म्हणजेच गर्दीच्या वेळी कोसळले असते, तर काय झाले असते? या विचारानेच आता लोकांच्या अंगावर काटा येत आहे. दिवसा या ठिकाणी प्रवासी, रिक्षाचालक, टॅक्सीचालक आणि सामान्यांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे या दुर्घटनेनंतर आता रेल्वे प्रशासनाच्या कामाच्या दर्जावर आणि नूतनीकरणावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

