25.8 C
Ratnagiri
Tuesday, February 24, 2026

समुद्रात सोडलेल्या डॉल्फिनचा अखेर मृत्यू

हर्णै समुद्रकिनाऱ्यावर जखमी अवस्थेत सापडलेल्या एका डॉल्फिनला...

दगाफटका करणाऱ्यांची गय नाही : मंत्री उदय सामंत

राज्याच्या तुलनेत जिल्ह्यामध्ये सर्वाधिक उमेदवार शिवसेनेने विजयी...

पोमेंडीतील देवराईत हळद्या, तांबट, वनघुबडाचे सुखद दर्शन

वेळ सकाळी सात, साडेसात, स्थळ पोमेंडीची देवराई,...
HomeSindhudurgढोलार काठी बसली… आणि बघता बघता गाव फुटलो, देवपळणीस प्रारंभ

ढोलार काठी बसली… आणि बघता बघता गाव फुटलो, देवपळणीस प्रारंभ

देवाने होकारार्थी कौल दिल्यास गाव पुन्हा भरतो.

रविवारी रात्री जेवणखाण आटोपून… ठरल्यापरमाणा रात्री ९ वाजण्याच्या सुमाराक श्री देव रवळनाथाचे मानकरी आणि मोजकीच ग्रामस्थ मंडळी… वायंगणी गावच्या रवळनाथ देवळात गोळा झालेले होते… घड्याळाचो काटो आपला काम करी होतो… रात्रीचे बारा वाजान गेले… मंदिरात हजर असलेल्यानी देव कामाक सुरुवात केल्यांनी… कोण कोणाबरोबर बोला नाय होतो… प्रत्येकजान नेमून दिलेला काम बिनबोभाट करी होते… येळ संपता संपा नाय होती… सगळेजान घड्याळाकडे बघी होते… आणि येकदाचो घड्याळाचो काटो दोनार सराकलो… गावच्या प्रमुख मानकऱ्यान डोळ्यान इशारो केल्यान आणि आकारी पुरुषाचा वारा येणाऱ्यान बाराचा पूर्वस म्हणजे नारळ हातात घेतल्यान… तेच्यातल्या येकान देवळाच्या दरवाजाक चुडात लावल्यान आणि रवळनाथ मंदिरातून पंचवीस तीसजान गावाच्या वेशीकडे निघाले. नुकतीच अमावशा झाल्यामुळा काळोख होतो… मोबायलच्या बॅटरेच्या उजेडात गपचूप सगळे चला होते आणि येकदाचे चिंदर गोसावीवाडीच्या देवाच्या आदस्थानात पोचले… गोसावीवाडीतल्या लोकांनी देवाच्या बैठकीची आधीच व्यवस्था करून ठेवलेली होती. मानकऱ्यांनी बाराचो पूर्वस ठेवल्यानी, दिवाबती केल्यानी आणि इशारो झालो… इशारो झाल्याबरोबर ढोलार काठी बसली… ढोलाचो आवाज ऐकान लोक सम जिले… देव वेशीभायर सुखरूप पोचलो… खरा तर तो इशारो होतो रवळनाथान. देऊळ सोडलेल्याचो… आणि फाटफटी पासूनच तीन दिवस आणि तीन रात्रीसाठी गाव सोडू साठी लोक तयारीक लागले… दुपारी तीन वाजापर्यंत वायंगणी गाव फुटलो आणि बघता बघता दोन हजार वस्तीचो गाव रिकामी झालो… मालवण तालुक्यातील वायंगणी गावच्या देवपळणीस सुरुवात झाल्याची ती चिन्हा होती.

पूर्वापारपासून वायंग्णी गावात दर तीन वर्षानी तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी देवपळण होते. या देवपळणीत ग्रामस्थही सहभागी होतात. मालवण तालुक्यात आचरा व चिंदर याठिकाणी गावपळण तर वैभववाडी तालुक्यात शिरोळे या ठिकाणी गावपळण होते तर वायंगणी गावात देवपळण होते. वायंगणी गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ हा तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी वेशीबाहेर राहतो. गावातच देव वास्तव्य करीत नसल्याने गावातील ग्रामस्थही आपले ग्रामदैवत श्री देव रवळनाथ समवेत या देवपळणीत सामील होतात. मालवण तालुक्यातील या तिन्ही गावाच्या गावपळणी व देवपळणी या सिंधुदुर्ग जिल्ह्यात नेहमीच आकर्षणाचा व चर्चे चा विषय ठरल्या आहेत. वायंगणी गावाच्या या देवपळणीस मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. यापूर्वी २०२२ साली देवपळण झाल्यावर तीनवर्षानंतर गत वर्षी होणारी देवपळण काही कारणास्तव रद्द करण्यात आली होती. त्यामुळे आता चार वर्षांनी यावर्षी देवपळण होत आहे. बारा वाड्यांचा गाव असणारा वायंगणी गाव सोमवारी सकाळपासून फुटला. या गावात श्री देव रवळनाथ, ठाणेश्वर, रामेश्वर, पावणाई, गांगेश्वर, विठ्ठलाई अशी देवस्थाने आहेत.

देवपळणीची तारीख देवाच्या कौलानुसार ठरते, त्यानुसार देवपळणीची तारीख जाहीर करण्यात आली. काल वायंगणीगावच्या वेशीबाहेर असणाऱ्या चाळ्यास बकऱ्यांचा भक्ष दिला गेला. हा भक्ष दिला गेल्यानंतर श्री देव रवळनाथांचे मानकरी व ग्रामस्थ मंदिरात जमा झाले. भल्या पहाटे श्री देव रवळनाथ हा आवाज न करता वेशीबाहेर जात असल्याने आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास श्री देव रवळनाथाने तीन दिवस आणि तीन रात्रीसाठी आपले राऊळ सोडले. तत्पूर्वी गावच्या मानकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी मंदिरात रात्र जागून काढली. पहाटे २ वाजण्याच्या सुमारास गावच्या गुरवाने श्री देव रवळनाथास गाऱ्हाणे घातले व तीन दिवस आणि तीन रात्रीसाठी रयत तुझ्या समवेत गाव सोडत असल्याचे सांगितले. त्यानंतर मंदिरातील बाराचा पूर्वस घेऊन ग्रामस्थ वायंगणी गावच्या वेशीबाहेर गेले. पेट्रोमॅक्सच्या बत्त्या, विजेरी आणि मोबाइल बॅटरीच्या प्रकाशात वायंगणीचा देव चिंदर गावातील गोसावी वाडीतील पूर्वापार चालत आलेल्या ठिकाणी विराजमान झाला. आणि ढोलताशांचा एकच गजर झालो. या गजरामुळे श्री देव रवळनाथ वेशीबाहेर पोहोचल्याचे संकेत ग्रामस्थांना मिळाले.

आज पासून देवपळणीस सुरुवात होत असल्याने गेले दोन दिवस वायंगणी गावातील ग्रामस्थांनी सामानाची बांधाबांध करण्यास सुरुवात केली होती. आज सुर्यनारायणाचे आगमन होताच वायंगणी गावातील लोकांनी वेशीबाहेर उभारलेल्या राहुट्यात सामान नेऊन ठेवण्यास सुरुवात केली. सकाळपासूनच वायंगणी गाव फुटण्यास सुरुवात झाली. वायंगणी गावातील ग्रामस्थ गुरे ढोरे, पाळीव प्राण्यांसह वेशीबाहेर निघाले होते. मिळेल त्या वाहनाने लोक गाव सोडत होते. सायंकाळी ४ वाजेपर्यंत लोकांनी गजबजलेला गाव लोकच वेशीबाहेर गेल्याने शांत झाला. तर वायंगणी गावच्या वेशीबाहेर मात्र गजबजाट वाढला. कालवली खाडी पट्ट्यात, खोतजुवा वं चिंदर येथे ग्राम स्थांनी राहुट्या उभारल्या आहेत. तर काही ग्रामस्थ चिंदर, आचरा, हडी येथे आपल्या नातेवाईकांकडे राहायला गेले आहेत. या देवपळणीत ग्रामपंचायत, शाळा सहभागी झाल्या आहेत. एकूणच देवपळणीत सहभागी झालेल्या ग्राम स्थांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

देवपळण म्हणजे काय – वायंगणी देवपळण व गावपळण विषयी बोलताना ग्रामदैवत श्री देव रवळनाथाचे मानकरी व ग्रामस्थांनी याबाबतची आख्यायिका सांगितली. देवपळणीची ही प्रथा शेकडो वर्षापासून सुरु आहे. गावात पिशाच, ‘भुत खेत यांच्या मुळे ग्रामस्थांना त्रास होऊ लागल्याने ग्रामदैवत रवळनाथाच्या हुकुमाने ग्रामदैवतेसह संपूर्ण गाव दर तीन वर्षांनी तीन दिवस व तीन रात्री गावाच्या सीमेबाहेर वास्तव्यास जाऊन, भुताखेतांना मोकळीक द्यावीत अशी यामागे आख्यायिका आहे. ग्रामदैवत रवळनाथाची डाळपस्वारी झाल्यानंतर दर तीन वर्षांनी देवाला देवपळणसाठी कौल लावला जातो. देवाने कौल दिल्यावर गावमेळा घेऊन देवपळणीची तारीख ठरविण्यात येते. गावपळणीच्या आदल्या दिवशी मानकरी व ग्रामस्थ देवळात जमुन देवपळणीचे नियोजन करुन रात्री देवळातच झोपतात. देवपळणी दिवशी पहाटे सर्व मानकरी व ग्रामस्थ एकमेकांशी न बोलता देवासह गाव सोडतात. प्रत्येक जण आपल्या घराच्या दाराला झावळे लावतो. रवळनाथ देवाचे श्रीफळ गावाबाहेरील चिंदर गोसावीवाडी येथे स्थापन करण्यात येतो. वायंगणी गाव सोडुन बाहेर पडलेले ग्रामस्थ आजुबाजुच्या गावात आश्रय घेतात. पळणीचे तीन दिवस पुर्ण झाल्यावर मानकरी रवळनाथाच्या श्रीफळास गावात प्रवेश करण्याबाबत कौल लावतात. देवाने होकारार्थी कौल दिल्यास गाव पुन्हा भरतो. मात्र नकारार्थी कौल दिल्यास ग्रामस्थ गावाबाहेर आणखी एक दिवस आपला मुक्काम वाढवतात, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली.

गुरुवारी गाव भरण्याची शक्यता – या देवपळणीत सहभागी झालेले ग्रामस्थ गावाबाहेर तीन दिवस व तीन रात्री निसर्गाच्या सानिध्यात जीवनाचा आनंद लुटणार आहेत. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम, क्रिकेट स्पर्धा, पारंपारिक खेळ आदी कार्यक्रम ही होणार आहेत. तीन दिवस तीन रात्री पूर्ण झाल्यावर गोसावीवाडी येथे देवाला कौल घेऊन गाव भरण्याचा हुकूम झाल्यावर गुरुवारी पुन्हा वायंगणी गाव भरेल अशी माहिती गावाकऱ्यांनी दिली.

RELATED ARTICLES

Most Popular