HomeRatnagiriडोंगर खोदाईचा माभळेवासीयांना फटका महामार्ग चौपदरीकरण

डोंगर खोदाईचा माभळेवासीयांना फटका महामार्ग चौपदरीकरण

उत्खनन केल्यानंतर तातडीने संरक्षण भिंत उभारणे आवश्यक होते.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे; मात्र संगमेश्वर तालुक्यातील माभळे येथे या कामासाठी केलेल्या डोंगर खोदाईमुळे स्थानिक ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. योग्य ठिकाणी संरक्षण भिंत न बांधल्याने परिसरातील घरे आता धोकादायक स्थितीत आली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. माभळे येथील डिंगणकर दवाखान्यासमोर महामार्गासाठी मोठ्या प्रमाणावर डोंगर खोदाई करण्यात आली आहे. नियमानुसार, एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्खनन केल्यानंतर तातडीने संरक्षण भिंत उभारणे आवश्यक होते; मात्र ठेकेदाराने केवळ खोदकामावर भर दिल्याने डोंगराचा मोठा भाग उघडा पडला आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात दरडी कोसळण्याची किंवा भूस्खलन होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मुख्य रस्त्याच्या बाजूलाच माती खाली आल्यामुळे वाहनांनाही त्याचा धोका पोहचू शकतो.

स्थानिक रहिवाशांनी व्यथा मांडताना सांगितले की, ‘डोंगर पायथ्याशी असलेल्या घरांच्या पायाभूत संरचनेवर या उत्खननामुळे ताण येत आहे. पावसाळ्यात डोंगरावरून वाहणारे पाणी थेट वस्तीत शिरून मोठी दुर्घटना घडू शकते. कामाच्या घाईत कंत्राटदार आमच्या जीविताशी खेळत आहे. माभळे ग्रामस्थांनी संबंधित प्रशासन आणि महामार्ग ठेकेदाराकडे तातडीने ‘रिटेनिंग वॉल’ उभारण्याची मागणी केली आहे. जर पावसाळ्यापूर्वी संरक्षक उपाययोजना केल्या नाहीत, तर आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. येथील घरमालकांना झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आला आहे. त्याबाबत लवकरच निर्णय होईल, असे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे.

नागरिकांचे संरक्षण महत्त्वाचे – महामार्ग उभारताना केवळ रस्ता रुंदीकरण महत्त्वाचे नसून, त्यासोबत स्थानिक नागरिकांचे संरक्षणही महत्त्वाचे आहे. कोणतीही जीवितहानी होण्यापूर्वी प्रशासनाने जागे व्हावे, अशी मागणी माभळेतील ग्रामस्थांनी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular