HomeKokanकोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या लढ्याला मोठे यश; सावंतवाडी स्थानकाला मिळणार प्रा. मधु...

कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या लढ्याला मोठे यश; सावंतवाडी स्थानकाला मिळणार प्रा. मधु दंडवते यांचे नाव!

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी; कोकणवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण.

सिंधुदुर्ग: कोकणच्या विकासात मैलाचा दगड ठरलेल्या कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी आणि संपूर्ण कोकणवासीयांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बातमी समोर आली आहे. ज्यांच्या दूरदृष्टीतून आणि अथक प्रयत्नांतून कोकण रेल्वेचे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले, त्या कोकण रेल्वेचे शिल्पकार दिवंगत प्रा. मधु दंडवते यांचे नाव आता ‘सावंतवाडी रोड’ रेल्वे स्थानकाला दिले जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत या नामांतराच्या प्रस्तावाला अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. ‘कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी’ने गेल्या अनेक महिन्यांपासून दिलेल्या प्रखर लढ्याला आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर हे मोठे यश आले आहे.

रस्त्यावरील आंदोलनापासून ते मंत्रालयातील मंजुरीपर्यंतचा प्रवास हे यश सहजासहजी मिळालेले नाही, तर त्यामागे प्रवाशांचा मोठा संघर्ष आणि संघटनेचा रेटा आहे. जानेवारी २०२४ मध्ये प्रवासी संघटनेने अत्यंत आक्रमक पवित्रा घेत प्रजासत्ताक दिनी थेट बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. प्रवाशांच्या या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासकीय पातळीवर वेगाने हालचाली सुरू झाल्या. १८ जानेवारी २०२४ रोजी महसूल विभागाने रेल्वे प्रशासनाला यासंदर्भात आवश्यक ते निर्देश दिले. त्यानंतर, २३ ऑगस्ट रोजी रेल्वे बोर्डाने स्पष्ट केले की, रेल्वे स्थानकाच्या नामांतराचा अंतिम अधिकार राज्य सरकारचा असतो. हा तांत्रिक मुद्दा लक्षात येताच, प्रवासी संघटनेने आपला मोर्चा मंत्रालयाकडे वळवला आणि पाठपुरावा अधिक तीव्र केला.

राजकीय इच्छाशक्ती आणि संघटनेची चिकाटी आली कामी या संपूर्ण प्रक्रियेत स्थानिक लोकप्रतिनिधींची साथ आणि प्रवासी संघटनेची चिकाटी अत्यंत महत्त्वाची ठरली. १८ मे रोजी प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेतली होती. त्यावेळी पालकमंत्र्यांनी ‘लवकरच गोड बातमी मिळेल’ असा शब्द दिला होता, जो अवघ्या चार दिवसांत पूर्ण झाला. याशिवाय, माजी मंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांनीही वेळोवेळी उच्चस्तरीय बैठका आणि जनता दरबाराच्या माध्यमातून हा प्रलंबित विषय मार्गी लावण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

मंत्रिमंडळाच्या या ऐतिहासिक निर्णयानंतर, प्रवासी संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, खासदार नारायण राणे यांच्यासह सर्वपक्षीय आमदार आणि खासदारांचे जाहीर आभार मानले आहेत. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला प्रा. मधु दंडवते यांचे नाव मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने, संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सध्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular