राजापूर: क्षणभराचा निष्काळजीपणा, उतारावर अनियंत्रित झालेली गाडी आणि डोळ्यांसमोर उभा ठाकलेला मृत्यू… पण म्हणतात ना, ‘देव तारी त्याला कोण मारी!’ याचाच प्रत्यय राजापूर तालुक्यातील पांगरे येथे शनिवारी सायंकाळी आला. पुण्यावरून दर्शनासाठी आलेल्या सात भाविकांची कार चक्क ५० फूट खोल दरीच्या दिशेने वेगाने घसरत गेली. मात्र, निसर्गाच्या एका अद्भुत चमत्काराने दरीच्या काठावरील दाट रानवेली देवदूतासारख्या धावून आल्या. त्यांनी त्या अवजड कारला रोखून धरले आणि कारमधील सातही जणांना काळाच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढले.
आनंदाच्या प्रवासात हँडब्रेक ठरला ‘व्हिलन’ मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील काही भाविक राजापूर येथील पांगरे भागात असलेल्या स्वामी शिवानंद टेंबे महाराज मठात आले होते. मठात मनसोक्त दर्शन घेतले, समाधीस्थळासमोर नतमस्तक झाले आणि सर्वजण अत्यंत आनंदाने परतीच्या प्रवासाची तयारी करू लागले. सायंकाळी ५ च्या सुमारास पांगरे पुलाजवळ उभी केलेली त्यांची कार सुरू करण्यात आली. मात्र, कार सुरू करत असताना ड्रायव्हरकडून हँडब्रेक (Handbrake) व्यवस्थित ओढला गेला नाही. रस्ता उताराचा असल्याने, काही समजण्याच्या आतच कार अचानक मागच्या बाजूने वेगाने घसरू लागली.
कारचा अर्धा भाग हवेत, श्वास रोखून धरणारा तो क्षण! गाडी रिव्हर्समध्ये वेगाने मागे जात असल्याचे लक्षात येताच कारमधील भाविकांच्या काळजाचा ठोका चुकला. कारच्या अगदी पाठीमागे तब्बल ५० फूट खोल दरी होती आणि खाली विखुरलेले होते मोठमोठे अणकुचीदार दगड. कार वेगाने मागे गेली आणि तिचा मागचा बहुतांश भाग थेट दरीच्या हवेत लटकला. मृत्यू अगदी काही इंचांवर होता. पण अगदी शेवटच्या क्षणी, दरीच्या टोकावर वाढलेल्या मजबूत रानवेली आणि दाट झुडपांमध्ये कारचा खालचा भाग घट्ट अडकला. त्या वेलींनी सात जीवांचे वजन आपल्या खांद्यावर पेलले आणि कार जागीच खिळली.
प्रसंगावधान राखले अन् ७ जीव सुखरूप राहिले कार दरीच्या काठावर लटकलेली असताना जरा जरी हालचाल झाली असती, तरी ती थेट ५० फूट खाली कोसळली असती. हे ओळखून गाडीतील भाविकांनी कमालीचे प्रसंगावधान राखले. त्यांनी मागचे दरवाजे उघडण्याची चूक न करता, अत्यंत हळुवारपणे आणि वजनाचा समतोल सांभाळत पुढच्या दरवाजातून एक-एक करून बाहेर पडण्यास सुरुवात केली. सुदैवाने, सर्वच्या सर्व सातही जण अगदी सुखरूप बाहेर आले. बाहेर पडल्यावर जेव्हा त्यांनी मागे वळून गाडीची अवस्था पाहिली, तेव्हा त्यांच्या अंगावर सरसरून काटा आला. गाडी जर आणखी एक फूट मागे गेली असती, तर आज मोठा अनर्थ घडला असता.
रानवेलींच्या रूपाने धावून आला ‘देवदूत’ या भीषण घटनेची माहिती मिळताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. दरीच्या टोकावर लटकणारी ती कार पाहून प्रत्येकजण थक्क झाला होता. निसर्गातील ज्या रानवेली आणि झुडपांकडे आपण सहसा कचरा म्हणून दुर्लक्ष करतो, त्याच वेली या सात कुटुंबांसाठी जीवनदान ठरल्या. “जर तिथे त्या मजबूत वेली नसत्या, तर आज सात घरांचे संसार उद्ध्वस्त झाले असते,” अशी भावना स्थानिक नागरिक कृतज्ञतेने व्यक्त करत आहेत.

