HomeRatnagiriलोटे एमआयडीसी 'ॲक्वा फूड' चोरीचा छडा; १५ लाखांच्या मुद्देमालासह चौघांना अटक

लोटे एमआयडीसी ‘ॲक्वा फूड’ चोरीचा छडा; १५ लाखांच्या मुद्देमालासह चौघांना अटक

डेन्मार्कवरून मागवलेली १५ लाखांची मशनरी चोरणारी आंतरराज्य टोळी खेड पोलिसांच्या जाळ्यात; मुख्य सूत्रधार ओडिसाचा.

लोटे : खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये (MIDC) काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका अत्यंत धाडसी आणि मोठ्या चोरीच्या घटनेचा तपास लावण्यात खेड पोलिसांना अखेर शंभर टक्के यश आले आहे. येथील ‘ॲक्वा फूड एक्झीम’ या नामांकित कंपनीतून लाखो रुपयांची महागडी आणि अत्याधुनिक यंत्रसामग्री चोरणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ओडिसा आणि मुंबईतील एकूण चार सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

विशेष म्हणजे, या चोरट्यांनी थेट गुजरातमध्ये नेऊन विकलेला १५ लाख रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून, सर्व आरोपींची रवानगी आता न्यायालयाने कोठडीत केली आहे.

डेन्मार्कवरून मागवलेली मशनरी केली लंपास!

ही चोरी २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२६ या कालावधीत अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली होती. चोरट्यांनी ज्या साहित्यावर हात साफ केला, ते अत्यंत मौल्यवान आणि वजनाने जड होते. यामध्ये चिपळूण येथील ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ शाखेकडे तारण ठेवलेले कंपनीतील चार मोठ्या मशिन्सचे महागडे स्पेअर पार्ट्स आणि प्रेशर वॉल्व्हचा समावेश होता.

इतकेच नाही, तर कंपनीने थेट डेन्मार्क देशातून ‘डॅनटेक फ्रिजिंग सिस्टीम’ (Dantech Freezing Systems) या जगप्रसिद्ध ब्रँडकडून मागवलेले तब्बल ७५० किलो वजनाचे अत्याधुनिक तांत्रिक साहित्यही या टोळीने गायब केले होते. या अवाढव्य चोरीबाबत १७ मार्च रोजी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

असा लागला छडा; ओडिसाचा ‘मास्टरमाइंड’ अटकेत

औद्योगिक क्षेत्रातील एवढ्या मोठ्या चोरीमुळे लोटे एमआयडीसी परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मात्र, खेड पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे चोरांचे नेटवर्क अचूक शोधून काढले. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:

१. जगन्नाथ विभूती (वय २६, रा. तुसरा-ओरिसा) २. दिलीप लक्ष्मण माझी (वय ३०, रा. चुडापाली-ओरिसा) ३. मंगेश शंकर काळे (वय ३८, रा. दिघागाव-नवी मुंबई) ४. देवरचंद साधू राणा (रा. राताखंडी-ओरिसा)

पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत ओडिसाचा राहणारा देवरचंद साधू राणा हाच या संपूर्ण हायप्रोफाईल चोरीचा मुख्य सूत्रधार (Mastermind) असल्याचे समोर आले आहे. तसेच, चोरीचे हे वजनदार साहित्य वाहून नेण्यासाठी त्यांनी वापरलेली MH 01 EM 9238 आणि MH 04 FR 1003 या क्रमांकांची दोन्ही वाहनेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

खेड पोलिसांची थेट गुजरातमध्ये धाड!

गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी आरोपींचा माग काढत थेट गुजरात गाठले. चोरट्यांनी हे साहित्य गुजरात मधील भावनगर येथील एका दुकानात विकले होते. खेड पोलिसांच्या पथकाने तिथे छापा टाकून चोरीला गेलेला १५ लाख रुपयांचा १००% मुद्देमाल जप्त केला.

खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले आणि पोलीस शिपाई विजेंद्र सातार्डेकर यांच्या पथकाने ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे. पोलिसांच्या या वेगवान कामगिरीमुळे लोटे एमआयडीसीतील उद्योजकांनी सुटकेचा श्वास सोडला असून पोलीस प्रशासनाचे मोठे कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular