रत्नागिरी: सध्या रत्नागिरीकरांना रात्री सुखाची झोप घेणं कठीण झालंय, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण, रत्नागिरी शहर आणि आसपासच्या परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. नाचणे भागात सलग दुसऱ्या दिवशी घरफोडीची एक मोठी घटना समोर आल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अवघ्या २४ तासांपूर्वीच याच भागातील सावंतनगर येथे सव्वा चार लाखांची चोरी झाली असताना, आता चोरट्यांनी पोलिसांना उघड आव्हान देत दुसरं बंद घर लक्ष्य केलं आहे.
कोल्हापूरला गेलेलं कुटुंब आणि चोरट्यांची ‘ती’ नजर!
मिळालेल्या माहितीनुसार, नाचणे ते नारायणमळी जाणाऱ्या रस्त्यावरील एका घरात हे कुटुंब राहत होतं. काही खाजगी कामासाठी हे सर्व कुटुंबीय कुलूप लावून कोल्हापूरला गेले होते. घर बंद आहे, शेजारीपाजारी शांतता आहे, हे हेरून चोरट्यांनी अत्यंत धाडसीपणे या घराला आपलं टार्गेट केलं. गुरुवारी (११ जून) जेव्हा हे कुटुंब प्रवासाहून आनंदाने परतलं, तेव्हा दारावरचं तुटलेलं कुलूप पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
आत जाऊन पाहिलं तर संपूर्ण घराची दुरवस्था झाली होती. कपाटातील कपडे, सामान सगळं काही अस्ताव्यस्त पडलं होतं. चोरट्यांनी कपाटांचे लॉक तोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेवर डल्ला मारला होता. कुटुंबाने तातडीने याची माहिती रत्नागिरी शहर पोलिसांना दिली.
पोलिसांची धावपळ अन् गस्तीवर प्रश्नचिन्ह
बुधवारी सावंतनगरच्या चोरीनंतर पोलिसांनी परिसरात गस्त वाढवल्याचा दावा केला होता. पण, चोरट्यांनी त्याच रात्री पोलिसांच्या या दाव्याची हवा काढत नवीन चोरीला अंजाम दिला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या चोरीत नेमका किती मुद्देमाल गेला, याचा अधिकृत आकडा तक्रारदारांच्या सविस्तर जबाबानंतरच समोर येईल. सध्या पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून संशयितांची चौकशी सुरू आहे.
एक मोलाचा सल्ला: मित्रांनो, जर तुम्हीही काही दिवसांसाठी गाव किंवा बाहेरगावी जाणार असाल, तर घराची सुरक्षा केवळ एका कुलुपावर सोडू नका. जाताना आपल्या विश्वासू शेजाऱ्यांना नक्की कल्पना द्या किंवा स्थानिक पोलिसांना पेट्रोलिंग दरम्यान तिकडे लक्ष ठेवण्याची विनंती करा. सतर्कता हाच सर्वात मोठा बचाव आहे!

