रत्नागिरी: गेल्या काही दिवसांपासून पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या आणि तीव्र उन्हाने होरपळणाऱ्या रत्नागिरीकरांना अखेर वरुणराजाने मोठा दिलासा दिला आहे. जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशीही पावसाने आपली दमदार हजेरी लावली असून, गुरुवारी दिवसभर मुसळधार आणि संततधार सरींचा जोर कायम होता. गेल्या अवघ्या २४ तासांत संपूर्ण जिल्ह्यात तब्बल २५५.४९ मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या दक्षिणेकडील तालुक्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे.
विसाव्या दिवसांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर मान्सून पुन्हा ‘अॅक्टिव्ह’ जून महिन्याच्या सुरुवातीला हजेरी लावल्यानंतर मान्सूनने अचानक संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पाठ फिरवली होती. तब्बल २० दिवसांच्या या प्रदीर्घ दडीमुळे शेतकरी कमालीचे चिंतेत होते, तर नागरिकही उन्हाळ्याच्या काहिलीने आणि पाणीटंचाईने हैराण झाले होते. मात्र, रविवारी सुरू झालेल्या पावसाने सोमवार, मंगळवार, बुधवार आणि आता गुरुवारीही सलग चौथ्या दिवशी आपला रूद्र अवतार दाखवत संपूर्ण जिल्ह्याला जलमय केले आहे. या पावसामुळे रखडलेल्या भात आणि नाचणीच्या पेरण्यांना आता वेग येणार असल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू उमटले आहे.
शहरात पाण्याचे साम्राज्य; हायवेवर मातीचा ढिगारा कोसळला सतत कोसळणाऱ्या या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी शहरातील माळनाका परिसरासह अनेक मुख्य रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले आहे. रस्त्यांच्या कडेला चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना साचलेल्या पाण्यातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागत आहे.
दरम्यान, या मुसळधार पावसाचा मोठा फटका मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला बसला. लांजा जवळील वेरळ येथे डोंगराचा एक मोठा मातीचा ढिगारा थेट महामार्गावर कोसळल्याने येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने युद्धपातळीवर काम सुरू करून माती हटवण्याचे प्रयत्न केले. सध्यातरी या संवेदनशील भागात केवळ ‘एकेरी वाहतूक’ (Single Lane) सुरू ठेवण्यात आली आहे.
पाऊस पडतोय, पण नदीपात्रे अजूनही कोरडीच! निसर्गाचा एक अजब विरोधाभास सध्या रत्नागिरीत पाहायला मिळत आहे. एकीकडे सलग चार दिवस मुसळधार पाऊस कोसळत असला, तरी जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत अजूनही अपेक्षित वाढ झालेली नाही. शास्त्री, सोनवी, कोदवली आणि मुचकुंदी या नद्या अजूनही कमालीच्या खालावलेल्या पातळीवर वाहत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, एवढा पाऊस पडूनही जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये आजही १८ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागत आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यासाठी आणि पाणीटंचाई पूर्णपणे संपण्यासाठी असाच जोर आणखी काही दिवस राहणे गरजेचे आहे.
२९ जूनपर्यंत ‘यलो अलर्ट’; ४०-५० किमी वेगाने वारे वाहणार हवामान विभागाने (IMD) रत्नागिरी जिल्ह्यासाठी पुढील २९ जूनपर्यंत ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या काळात जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. पाऊस कोसळत असतानाच ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहतील आणि विजांचा कडकडाट होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील मच्छीमार आणि नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

