HomeMaharashtraपुणे क्राईम: 'टक्कल आणि विग'मुळे लग्न नको; लोहगडावर प्रियकरासोबत रचला केतनच्या हत्येचा...

पुणे क्राईम: ‘टक्कल आणि विग’मुळे लग्न नको; लोहगडावर प्रियकरासोबत रचला केतनच्या हत्येचा भयानक कट!

लोहगड किल्ला हत्या प्रकरण: आरोपी सिया गोयलचा पोलिसांसमोर धक्कादायक खुलासा, वडिलांची प्रकृती चिंताजनक.

टक्कल आणि केसांचा विग: वादाची ठिणगी

पोलीस चौकशीदरम्यान आरोपी सिया गोयल हिने गुन्ह्याची कबुली देत असताना लग्न मोडण्यामागचे एक मुख्य कारण सांगितले. केतनला टक्कल होते आणि तो डोक्यावर केसांचा विग वापरायचा, ही गोष्ट सियाला प्रचंड खटकत होती. याच कारणावरून तिच्या मनात केतनबद्दल कमालीचा दुरावा निर्माण झाला होता. तिला कोणत्याही परिस्थितीत केतनसोबत लग्न करायचे नव्हते. यातूनच तिने आपला कथित प्रियकर चेतन चौधरी याच्यासोबत मिळून केतनचा काटा काढण्याचा भयानक कट रचला.

अपघाताचा बनाव आणि लोहगडावर ‘रेकी’

केतनला ट्रेकिंगची प्रचंड आवड होती, हीच गोष्ट त्याच्यासाठी काळ ठरली. सिया आणि चेतनने याच आवडीचा फायदा घेण्याचे ठरवले. केतनला एखाद्या किल्ल्यावर न्यायचे आणि तिथून त्याला खोल दरीत ढकलून हा केवळ एक अपघात आहे, असा बनाव रचायचा असे त्यांनी ठरवले. यासाठी त्यांनी लोहगड किल्ल्याची निवड केली. हा कट इतका पूर्वनियोजित होता की, गुन्हा करण्यापूर्वी या दोघांनी तब्बल तीन वेळा लोहगड किल्ल्यावर जाऊन ‘रेकी’ केली होती. किल्ल्यावरील कोणत्या टोकावरून ढकलल्यास तो थेट दरीत पडेल आणि पोलिसांना संशय येणार नाही, अशा जागांची त्यांनी आधीच पाहणी केली होती.

पहिला प्रयत्न अपयशी, दुसऱ्यांदा यशस्वी घातपात

तपासातील माहितीनुसार, १४ जून रोजी केतन आणि सिया पहिल्यांदा लोहगडवर गेले होते. तिथे सियाने केतनला दरीत ढकलण्याचा पहिला प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने खाली पडत असताना केतनने एका झाडाची फांदी पकडली आणि त्याचा जीव वाचला. केतनने विचारणा केली असता, “तिथे साप आला होता, त्यामुळे गडबड झाली,” अशी खोटी कथा रचून सियाने तो प्रसंग तात्पुरता मारून नेला.

एकटीने केतनला ढकलणे शक्य नाही हे समजल्यावर सियाने तिचा प्रियकर चेतन चौधरीची मदत घेतली. १८ जून रोजी हे तिघे पुन्हा लोहगडावर गेले. यावेळी चेतन काही अंतरावरून त्यांच्या मागे चालत होता. योग्य वेळ आणि सियाचा इशारा मिळताच, चेतनने मागून येत केतनला थेट खोल दरीत ढकलून दिले.

पुरावे आणि अटक

सुरुवातीला हा एक दुर्दैवी अपघात असल्याचा संशय होता. मात्र, लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक तपास, मोबाईल कॉल रेकॉर्ड्स (CDR), चॅट्स आणि संशयित हालचालींच्या आधारे हा संपूर्ण कट उघडकीस आणला. आज सिया पोलिसांच्या चौकशीत पूर्णपणे पोपटासारखी बोलू लागली असून तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेच्या धक्क्याने सियाचे वडील सध्या अतिदक्षता विभागात (ICU) दाखल असून, “जर माझी मुलगी दोषी असेल, तर तिलाही लोहगडावरून ढकलून द्या,” अशी उद्विग्न प्रतिक्रिया तिच्या आईने दिली आहे. सध्या सिया आणि चेतन दोन्ही पोलीस कोठडीत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular