रत्नागिरी: कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला थेट कात्री लावणारा एक निर्णय सध्या रत्नागिरी रेल्वे स्थानकावर वादाचा विषय ठरला आहे. रेल्वे स्थानकावरील प्रसाधनगृहामध्ये लघवीसाठी (Urinals) प्रवाशांकडून तब्बल ५ रुपये शुल्क आकारले जात असल्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. मात्र, आता या जाचक शुल्कातून प्रवाशांची कायमची सुटका होण्याची चिन्हे दिसत आहेत. युवा सेनेच्या आक्रमक भूमिकेनंतर कोकण रेल्वे प्रशासनाने या समस्येची गंभीर दखल घेत हे शुल्क थेट रद्द करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.
काय आहे नेमके प्रकरण? चालू वर्षात, म्हणजेच १ एप्रिलपासून रेल्वे प्रशासनाने रत्नागिरी स्थानकावरील प्रसाधनगृहाची जबाबदारी ‘चालवा व देखभाल’ (Operate and Maintain) या तत्त्वावर एका खाजगी एजन्सीला (ठेकेदाराला) सोपवली आहे. या नव्या ठेक्यातील नियमांनुसार, झोनल रेल्वे धोरणाचा (Zonal Railway Policy) हवाला देत चक्क लघवीसाठीही ५ रुपये शुल्क वसूल करण्यास सुरुवात झाली. रेल्वे स्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी अशा मूलभूत सुविधेसाठी ५ रुपये मोजावे लागत असल्यामुळे गरिबांपासून ते रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांपर्यंत सर्वांनाच याचा मोठा भुर्दंड सहन करावा लागत होता.
युवासेनेचा आक्रमक पवित्रा आणि रेल्वे प्रशासनाचे लेखी पत्र प्रवाशांवर होणारा हा अन्याय पाहून युवासेना जिल्हा युवाधिकारी प्रसाद सुरेश सावंत यांनी थेट कोकण रेल्वे प्रशासनाकडे याविरोधात अधिकृत तक्रार नोंदवली. रेल्वे प्रशासनानेही या तक्रारीची दखल घेत नमते घेतले आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे मंडळ वाणिज्य प्रबंधक शैलेश आंबर्डेकर यांनी स्वतः प्रसाद सावंत यांना लेखी पत्र पाठवून याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. या पत्रानुसार, प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन रत्नागिरी स्थानकावरील हे ५ रुपयांचे शुल्क कायमचे रद्द करून ती सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा ‘उचित निर्णय प्रस्ताव’ कोकण रेल्वेच्या बेलापूर (नवी मुंबई) येथील मुख्य निगम कार्यालयाकडे (Corporate Office) मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
१५ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा… कोकण रेल्वे प्रशासनाकडून २२ जून रोजी हे सकारात्मक पत्र मिळाले असले, तरी युवासेना केवळ आश्वासनांवर थांबलेली नाही. जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी रेल्वे प्रशासनाला कडक शब्दांत इशारा दिला आहे की, “येत्या १५ दिवसांच्या आत बेलापूर कार्यालयातून या प्रस्तावाला मंजुरी मिळून हे शुल्क रद्द झाले पाहिजे. जर असे झाले नाही, तर १६ व्या दिवशी प्रसाधनगृहात ठेकेदाराचा एकही माणूस वसुलीसाठी दिसणार नाही.”
युवासेनेच्या या थेट इशाऱ्यामुळे आता बेलापूर येथील मुख्य रेल्वे कार्यालय नेमका काय निर्णय घेते आणि रत्नागिरीकरांना या ५ रुपयांच्या भुर्दंडापासून कधी मुक्ती मिळते, याकडे सर्व प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

