रत्नागिरी: राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’चे कोकणातील बळीराजाने स्वागत केले असले, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीदरम्यान येणाऱ्या तांत्रिक त्रुटींमुळे शेकडो पात्र शेतकरी या लाभापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टी दक्षिण रत्नागिरीचे तालुकाध्यक्ष संयोग उर्फ दादा दळी यांनी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची रत्नागिरी दौऱ्यादरम्यान भेट घेतली व त्यांना निवेदनाद्वारे तातडीने मार्ग काढण्याची विनंती केली.
ॲग्रीमेंटवरील कर्ज आणि ७/१२ वरील भिन्न नावे: समस्येचे मूळ
कोकणातील, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक आंबा उत्पादक व इतर शेतकऱ्यांनी विविध वित्तीय संस्थांकडून करारपत्राच्या (Agreement) आधारे पीक कर्ज घेतले होते. अनेक कुटुंबांमध्ये प्रत्यक्ष कर्जदार व्यक्ती ही घरातील मुलगा, पत्नी किंवा सून आहे. परंतु, संबंधित शेतजमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर मात्र कुटुंबप्रमुख असणारे वडील, पती किंवा सासरे यांची नावे नोंदवलेली आहेत.
या नावांच्या भिन्नतेमुळे महाडीबीटी अथवा संबंधित पोर्टलवर कर्जदार व्यक्तीचा ‘फार्मर आयडी’ (Farmer ID) तयार करताना मोठ्या तांत्रिक अडचणी येत आहेत. ‘फार्मर आयडी’ तयार होत नसल्यामुळे बँक व महसूल विभागाच्या पात्र लाभार्थ्यांच्या यादीत नाव असूनही प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळण्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
२ लाखांपर्यंतची कर्जमाफी सरसकट देण्याची मागणी
हवामान बदल आणि निसर्गाच्या अवकृपेमुळे गेल्या काही वर्षांत कोकणातील आंबा पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून बागायतदार व शेतकरी आधीच मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत केवळ तांत्रिक त्रुटी किंवा आयडी अभावी शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिल्यास त्यांच्यावर मोठा अन्याय होईल, अशी चिंता दादा दळी यांनी व्यक्त केली.
शासनाने या समस्येची दखल घेऊन नियमावलीत आवश्यक ते शिथिलीकरण करावे आणि २ लाख रुपयांपर्यंतची शेतकरी कर्जमाफी सरसकट सर्व पात्र व गरजू शेतकऱ्यांना विनाअडथळा मिळावी, असा धोरणात्मक निर्णय महसूलमंत्र्यांनी त्वरित घ्यावा, अशी जोरदार मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

