सांगली : राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा तिढा दिवसेंदिवस अधिकच तापत चालला आहे. एकीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेने भव्य मोर्चा धडकत असताना, दुसरीकडे ओबीसी संघटनांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. सांगली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ओबीसी हक्क कार्यकर्ते लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकार, मुख्यमंत्री, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर सडकून टीका केली.
“ओबीसींचे आरक्षण संपले आहे, हा माझा दावा”
सांगलीतील पत्रकार परिषदेत बोलताना लक्ष्मण हाके यांनी सद्यस्थितीवर तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “आज ओबीसींचे आरक्षण अक्षरशः धोक्यात आले नसून ते पूर्णपणे संपले आहे, हा माझा स्पष्ट दावा आहे.”
पुढे बोलताना त्यांनी आरोप केला की, राजकीय स्वार्थासाठी नियम डावलून सरसकट कुणबी आणि इतर दाखले वाटले जात आहेत. ओबीसी समाज असंघटित असल्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष केवळ निवडणुकांपुरता मतांसाठी या समाजाचा वापर करत आला आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, या संपूर्ण घडामोडींवर प्रस्थापित ओबीसी नेते स्वतःच्या राजकीय सोयीसाठी तोंडात मूग गिळून गप्प बसले आहेत, असा घणाघात त्यांनी केला. सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनीही जरांगेंच्या आंदोलनाला समर्थन दिल्याचा उल्लेख करत, सध्या मराठा समाजात नेमके कोणते आरक्षण हवे यावरच मोठा संभ्रम निर्माण झाला असल्याचे हाके म्हणाले.
“ओबीसींच्या लेकरांचा बळी देऊन लढा जिंकायचा आहे का?”
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर आणि सरकारच्या भूमिकेवर बोलताना हाके यांनी अत्यंत बोचरे सवाल उपस्थित केले.
“मंत्र्यांच्या फौजा वारंवार जरांगे पाटलांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला राजकीय बळ पुरवत आहेत. मुख्यमंत्र्यांनी तर ओबीसी आरक्षणाचा सरळ ‘जनरल वॉर्ड’ करून टाकला आहे. महाराष्ट्रात सर्रास संविधानविरोधी पावले उचलली जात आहेत. जरांगे, तुमचा लढा मराठा समाजातील गोरगरीब मुलांसाठी असेल तर त्याला आक्षेप नाही; मात्र ओबीसींच्या हक्कांच्या लेकराबाळांचा बळी देऊन तुम्हाला हा लढा जिंकायचा आहे का?” असा परखड सवाल त्यांनी केला.
गोपीचंद पडळकरांच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह
भाजपचे आक्रमक आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आंदोलनात्मक पवित्र्यावरही लक्ष्मण हाकेंनी थेट निशाणा साधला. “पडळकर हे स्वतः सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत आणि ते मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या ‘किचन कॅबिनेट’मधील मानले जातात. मग सत्ताधारी बाकांवर बसलेला नेता सरकारविरोधात आंदोलन कसे काय करू शकतो?” असा सवाल करत त्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला.
धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी स्पष्ट केले की, धनगर समाजाच्या हक्कांची लढाई स्वतः धनगर समाजानेच रस्त्यावर उतरून लढली पाहिजे, कोणाच्या राजकीय दबावाखाली येऊन नाही.
‘वेळ पडल्यास ओबीसींचा स्वतंत्र पक्ष काढू’
ओबीसी समाजाच्या एकजुटीची ताकद दाखवून देताना लक्ष्मण हाकेंनी राजकीय पक्षांना निर्वाणीचा इशारा दिला. जर ओबीसी समाज जागा झाला आणि एकत्रित आला, तर महाराष्ट्रातील अनेक मातब्बर नेत्यांचे डिपॉझिट जप्त होईल. हक्कांचे रक्षण करण्यासाठी गरज पडल्यास ओबीसींचा स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करू, असा इशाराही त्यांनी दिला.
याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही शेवटची टर्म असल्याचे नमूद करत, देशात त्वरित ‘डिलिमिटेशन’ (मतदारसंघ पुनर्रचना) कायदा लागू करण्यात यावा, अशी महत्त्वाची मागणीही त्यांनी यावेळी लावून धरली.

