HomeRatnagiriबनावट Gas Booking Apps पासून सावध राहा! रत्नागिरी सायबर पोलिसांचे आवाहन

बनावट Gas Booking Apps पासून सावध राहा! रत्नागिरी सायबर पोलिसांचे आवाहन

ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी रत्नागिरी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ५ महत्त्वाचे सुवर्णनियम जारी.

रत्नागिरी: आजच्या डिजिटल युगात गॅस बुकिंग असो वा इतर घरगुती सेवा, बहुतांश नागरिक मोबाईल ॲप्स आणि ऑनलाइन माध्यमांचा वापर प्राधान्याने करतात. मात्र, नागरिकांच्या याच सवयीचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगार नवनवीन क्लृप्त्या शोधून लोकांची फसवणूक करत आहेत. सध्या गॅस बुकिंगच्या नावाखाली बनावट मोबाईल ॲप्स (Fake Gas Distribution Apps) आणि अनधिकृत व्हॉट्सॲप लिंक्स पाठवून नागरिकांचे बँक खाते रिकामे करण्याचे प्रकार समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर, रत्नागिरी पोलीस दल आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी सायबर पोलिसांनी नागरिकांसाठी महत्त्वाचा इशारा आणि जनजागृती सूचना जारी केली आहे.

गॅस सिलिंडर बुकिंगच्या बहाण्याने मोबाईलवर पाठवल्या जाणाऱ्या अनधिकृत APK फाईल्स किंवा मेसेजमधील लिंक्सवर क्लिक केल्यास मोबाईलचा ताबा सायबर भामट्यांकडे जाऊ शकतो. त्यामुळे अशा फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सायबर पोलिसांनी नागरिकांना खालील ५ सुवर्णनियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे:

सुरक्षित राहण्यासाठी हे ५ सुवर्णनियम नक्की पाळा:

  1. केवळ अधिकृत स्रोतांचाच वापर करा:

    गॅस सिलिंडर बुकिंग किंवा इतर कोणत्याही सेवेसाठी केवळ गॅस कंपनीच्या अधिकृत ॲप्लिकेशनचा (Official App) किंवा अधिकृत संकेतस्थळाचाच (Website) वापर करा.

  2. अनामिक लिंक्स किंवा APK फाईल्स डाउनलोड करू नका:

    व्हॉट्सॲप, मेसेज किंवा सोशल मीडियावर आलेल्या अनोळखी लिंक्सवरून कोणतीही APK फाईल किंवा ॲप डाऊनलोड करण्याची चूक करू नका.

  3. गोपनीय माहिती कोणाशीही शेअर करू नका:

    तुमचा OTP, UPI PIN, एटीएम किंवा क्रेडिट कार्डचा CVV तसेच बँक खात्याची कोणतीही वैयक्तिक माहिती फोनवरून किंवा ऑनलाईन स्वरूपात कोणालाही देऊ नका.

  4. ॲप इंस्टॉल करण्यापूर्वी माहिती तपासा:

    प्लॅटफॉर्मवरून कोणतेही ॲप डाऊनलोड करताना त्याचा पब्लिशर (Publisher/Developer) कोण आहे, त्याची विश्वासार्हता आणि इतर युझर्सचे रिव्ह्यूज (Reviews) नक्की तपासा.

  5. संशयास्पद लिंक्सवर क्लिक करणे टाळा:

    लोभस ऑफर, सूट किंवा तातडीच्या बुकिंगचा दावा करणाऱ्या अनोळखी किंवा संशयास्पद मेसेजेस मधील लिंक्सवर क्लिक करू नका.

ऑनलाइन फसवणूक झाल्यास काय कराल?

दुर्दैवाने तुमची किंवा तुमच्या परिचयातील कोणाची सायबर फसवणूक झाल्यास अजिबात घाबरून न जाता तात्काळ खालील पावले उचला:

  • हेल्पलाइन नंबर: सायबर क्राईमच्या १९३० (1930) या राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांकावर त्वरित संपर्क साधून तक्रार नोंदवा.

  • अधिकृत वेब पोर्टल: केंद्र सरकारच्या www.cybercrime.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपली तक्रार ऑनलाईन नोंदवू शकता.

सुरक्षिततेचा मंत्र:

“विचार करा मग क्लिक करा. तुमची माहिती, तुमची जबाबदारी – सुरक्षित व्यवहार, डिजिटल स्वीकार.”

RELATED ARTICLES

Most Popular