रत्नागिरी: बाहेर हॉटेल्समध्ये किंवा कॅन्टीनमध्ये जेवायला जाताना अन्नाच्या दर्जाबाबत तुम्हालाही शंका येते का? तर मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व लहान-मोठी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बेकऱ्या, क्लब्स आणि अगदी शासकीय कार्यालयातील कॅन्टीनवर आता ‘अन्न व औषध प्रशासन’ (FDA) विभागाची नजर राहणार आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी कोणताही तडजोड खपवून न घेता, नियमभंग करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी मनुजजिंदल यांनी दिले आहेत.
तुकाराम मुंडेंच्या मोहिमेचा आता रत्नागिरीतही प्रभाव
सध्या संपूर्ण राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली अस्वच्छता, निकृष्ट अन्न आणि नियम तुडवणाऱ्या खाद्य आस्थापनांवर जोरदार धडक कारवाई सुरू आहे. याच धर्तीवर रत्नागिरीत अजून व्यापक मोहीम का सुरू झाली नाही, असा थेट सवाल नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आला होता.
या प्रश्नाला गांभीर्याने घेत जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी रत्नागिरीतही तातडीने विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे निर्देश दिले आहेत. “ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची गय केली जाणार नाही; नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
खासगी हॉटेल्ससोबतच सरकारी कॅन्टीनवरही बारकाईने लक्ष
या मोहिमेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, ही कारवाई केवळ शहरातील खासगी हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट्सपुरती मर्यादित राहणार नाही. तर विविध शासकीय कार्यालयांमधील कॅन्टीन, स्थानिक बेकऱ्या आणि क्लब्स यांचीही कसून तपासणी केली जाईल. तपासणी दरम्यान नियमांचे उल्लंघन किंवा गंभीर त्रुटी आढळल्यास संबंधित आस्थापनेचा परवाना थेट निलंबित किंवा कायमस्वरूपी रद्द केला जाऊ शकतो.
‘या’ त्रुटी आढळल्यास परवाना होणार रद्द!
प्रशासनाने तपासणीदरम्यान खालील मुद्द्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे:
-
स्वयंपाकघरातील अस्वच्छता: किचन किंवा अन्न साठवणुकीच्या जागेत घाण व अस्वच्छता आढळल्यास.
-
उपद्रवी कीटकांचा वावर: स्वयंपाकघर किंवा साठवणुकीच्या ठिकाणी उंदीर, झुरळे किंवा इतर कीटकांचा वावर असणे.
-
मुदतबाह्य अन्नपदार्थ: एक्सपायरी डेट उलटून गेलेले साहित्य किंवा शिळे अन्नपदार्थ वापरणे वा विकणे.
-
खाद्यतेलाचा पुनर्वापर: एकदा वापरलेले तळणीचे तेल आरोग्यास घातक असतानाही ते पुन्हा पुन्हा वापरणे.
-
निकृष्ट व भेसळयुक्त माल: कमी दर्जाचा किंवा भेसळयुक्त कच्चा माल वापरणे.
-
एफडीए नियमावलीचे उल्लंघन: अन्न सुरक्षा कायद्यानुसार आवश्यक परवाने आणि नियमांची पूर्तता न करणे.
रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे आता हॉटेल व्यवसायिकांना अन्न सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करावेच लागणार आहे.

